हल्ली डेटिंग अॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढू लागला आहे. तरुणाई या मोबाईल अॅप्सवर स्वत:साठी जोडीदार शोधू लागली आहे. पण काही डेटिंग अॅपवर फसवणुकीचेही प्रकार समोर येऊ लागले आहेत. यात अनेक प्रोफाईल हे फेक असून त्याद्वारे संबंधित व्यक्तीला फसवून खंडणी उकळण्याचं रॅकेटच चालू असल्याचा प्रकार नुकत्याच एका प्रकरणावरून चर्चेत आला आहे. गुरुग्राम पोलिसांनी यासंदर्भात २७ वर्षीय बिनिता कुमारी या महिलेला अटक केली असून तिच्या एका साथीदाराच्याही मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकारामुळे डेटिंग अॅप्स बद्दल संशयाचं वातावरण तयार झालं आहे.
नेमकं प्रकरण काय?
गुरुग्राम पोलिसांनी आयटी फर्ममध्ये काम करणाऱ्या बिनिता कुमारी नामक महिलेला अटक केली. एका फसवणूकप्रकरणी गुरुग्राम पोलिसांत तिच्यासह तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात चौकशी करून पोलिसांनी या दुकलीला अटक केली आहे. आत्तापर्यंत या दोघांनी मिळून एकूण १२ पुरुषांना अशाच प्रकारे गंडा घालून फसवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. यासाठी त्यांनी डेटिंग अॅपचा वापर केल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे.
काय होती मोडस ऑपरेंडी?
बिनिता कुमारी ही मूळची बिहारची आहे. तिचा साथीदार महेश फोगाट याच्या मदतीने तिने डेटिंग अॅपच्या सहाय्याने १२ पुरुषांना फसवल्याचं समोर आलं आहे. या दोघांची मोडस ऑपरेंडी डेटिंग अॅपच्याच माध्यमातून नियोजन करण्याची होती. नुकतीच बिनितानं एका व्यक्तीला अशाचप्रकारे डेटिंग अॅपवरून संपर्क करून फसवण्याचा प्रयत्न केला. पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्या दोघांचे कारनामे उघड झाले.
बिनिता हिने एका डेटिंग अॅपवर ‘B’ या टोपणनावाने अकाऊंट सुरू केलं. या नावाने तिने पीडित व्यक्तीशी संवाद साधायला सुरुवात केली. हळूहळू त्या व्यक्तीला तिने आपल्या बोलण्यात अडकवून भेटण्यासाठी राजी केलं. ‘आपल्याला दारू प्यायची आणि मजा करायची आहे’ असं सांगून संबंधित तक्रारदाराला तिच्यासोबत हॉटेलात येण्याची गळ घातली.
२८ मे रोजी बिनिताने तक्रारदाराची भेट घेऊन त्याला सेक्टर २३मधल्या एका हॉटेलात नेलं. तिथे तक्रारदाराला बीअर पिण्यासाठी आग्रह केला. हा सगळा प्रकार संशयास्पद वाटल्यानं तक्रारदारानं तिथून काढता पाय घेतला. पण काही वेळातच सगळं चित्र पालटलं!
विनयभंगाचा आरोप!
बिनितानं तक्रारदार व्यक्तीला फोन करून त्याच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला. आपल्यावर जबरदस्ती केल्याचा दावाही केला. पोलिसांकडे असं सांगून तक्रार दाखल करण्याची धमकीही बिनितानं त्याला दिली. यानंतर तक्रारदाराला पुढचा फोन बिनिताचा साथीदार अर्थात महेश फोगाटचा आला. महेश फोगाट लैंगिक अत्याचार पीडित महिलांच्या मदतीच्या नावाखाली एक बोगस एनजीओ चालवतो. त्यानं हे प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून २ लाख रुपयांची मागणी केली. या सगळ्या प्रकाराला घाबरून तक्रारदार व्यकतीने त्यांना ५० हजार रुपयेही दिले. पण नंतर त्यानं थेट पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
…आणि पोलिसांनी सापळा रचला!
तक्रारदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने पावलं उचलली. बिनिता आणि महेशच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला. त्यानुसार, तक्रारदाराने बिनिताला उरलेली रक्कम घेण्यासाठी बोलवलं. गुरुग्राममधल्या मौलसरी मार्केटमध्ये भेटायचं ठरलं. महेश फोगाट पैसे घेण्यासाठी आला तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर बिनिता कुमारीलाही डीएलएफ-३ भागातून अटक करण्यात आली.
या दोघांनी आत्तापर्यंत १२ जणांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी पाच जणांविरोधात थेट बलात्कार आणि विनयभंगाचेही आरोप केले आहेत.