इराणने मंगळवारी सुमारे १८० क्षेपाणास्त्रे इस्रायलवर डागली असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. यातील बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली आहेत. यारून इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी इस्रायलला इशारा दिला आहे. इस्रायलच्या तेल अवीवने तेहरानच्या राष्ट्रीय संपत्ती आणि प्रदेशातील हितसंबंधांवर हल्ले थांबवले नाही तर इराण इस्रायलवर पुन्हा हल्ला करेल, असा सूचक इशारा इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी दिला. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.
इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला हा “प्रत्युत्तराची कारवाई” आहे म्हणत राजदूत म्हणाले की, “इराण आपल्या आंतरराष्ट्रीय हितसंबंध आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल विनोद करत नाही.” गाझा पट्टीमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील जवळजवळ वर्षभर चाललेला संघर्ष हेझबोलाच्या मृत्यूमुळे तीव्र झाला आहे. हेझबोला ही हमासला पाठिंबा देणारी इराण समर्थित अतिरेकी संघटना आहे. गेल्या आठवड्यात मारल्या गेलेल्या हेझबोलाच्या प्रमुख हसन नसराल्लाहच्या मृत्यूचा बदला घेण्याची इराणने शपथ घेतली होती आणि इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा दिला होता.
दक्षिण लेबनॉनमधील रक्तपात प्रत्येकजण पाहतोय
एनडीटीव्हीशी बोलताना इराणचे राजदूत म्हणाले, “जर इस्रायलने आपले शत्रुत्व आणि इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्धचे उल्लंघन थांबवले नाही, तर त्यांना पुन्हा पुन्हा अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागेल. पश्चिम आशियातील इस्रायलच्या शत्रुत्वाच्या हालचाली या प्रदेशातीलच नव्हे तर जगभरातील लोक पाहत आहेत. गाझा आणि दक्षिण लेबनॉनमधील रक्तपात प्रत्येकजण पाहत आहे. लोक संतप्त आहेत. इस्रायलने सर्व मानवाधिकार करारांचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे.त्यामुळे, इस्रायल या प्रदेशात जे काही करत आहे त्याबद्दल जगभरातील अनेक लोक खूप संतापले आहेत.”
हेही वाचा >> विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?
नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर
राजदूत पुढे म्हणाले की, “इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला जगभरातील अनेक लोकांचे समर्थन मिळेल, असा विश्वास आहे. पॅलेस्टाईनवर इस्रायलच्या क्रूरतेचा निषेध करण्यासाठी लोकांनी जगभरातील विद्यापीठांमध्ये कसे मोर्चा काढले ते तुम्ही पाहिले आहे.” तसंच, इराणच्या राजदूतांनी बिन्यामिन नेतान्याहू यांना २१ व्या शतकातील हिटलर असंही संबोधलं.
भारताकडे काय मागितली मदत?
इराणचे राजदूत म्हणाले की, “भारत हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचे इस्रायलशी चांगले संबंध आहेत आणि पंतप्रधान मोदींनी नमूद केल्याप्रमाणे हा युद्धाचा काळ नाही. इराणमध्ये आमचा असा विश्वास आहे. पण जर एखादा देश दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करतो, तर त्या देशाने आणखी काय करावं? परंतु, दोन्ही देशांशी जवळचे संबंध असलेला भारत देश इस्रायलला या प्रदेशातील क्रूरता थांबवण्यास मदत करू शकेल”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.”