पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तुरुंगातून त्याने एका पाकिस्तानी गँगस्टरबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला असल्याचा हा व्हिडिओ आहे. अवघ्या १९ सेकंदाचा हा व्हिडिओ असून ईदनिमित्ताने हा व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. दरम्यान, या व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश गुजरात सरकारने दिले आहेत.

बिश्नोई याने व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओनुसार, भट्टी बोलतोय की, “युएई आणि देशांमध्ये ईद साजरी झाली आहे. तर, उद्या पाकिस्तानात ईद आहे.” दरम्यान, या व्हायरल व्हिडिओची चौकशी केली जाणार आहे. कारण, तुरुंगात असतानाही ते मुक्तपणे गुन्हेगारी विश्वात वावरत आहेत. बुधवारी गुजरात गुन्हे शाखेने हा व्हिडिओ सध्याचा नसून गुजरातच्या साबरमती सेंट्रल तुरुंगातील नसल्याचंही म्हटलं आहे. याच तुरुंगात सध्या बिश्नोई अटकेत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड झाल्याचं सांगितलं जातंय.

हेही वाचा >> मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्री ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ लिहिताना अडखळल्या, फळ्यावर काय लिहिलं एकदा वाचाच!

हा व्हिडिओ दिल्लीच्या तिहार जेल किंवा पंजाबच्या सेंट्रल जेल बठिंडामधील असू शकतो. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून हा व्हिडीओ कुठून रेकॉर्ड करण्यात आला आहे, याची चौकशी सुरू आहे. परंतु, हा व्हिडिओ नक्कीच गुजरात जेलमधील नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कथित व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मंत्री विक्रम सिंह मजिठिया यांनी बिश्नोईच्या कृतींविषयी चिंता व्यक्त केली आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये मजिठिया म्हणाले की, मूसावालाच्या हत्येमध्ये आणि सलमान खानच्या निवासस्थानावरील हल्ल्यांमध्ये बिश्नोईचा कथित सहभाग आहे. पंजाब तुरुंगातून तो थेट फोनवरून संवाद साधतोय. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बिश्नोईच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमलं असतानाही या समितीने अद्यापही कोणताही अहवाल दिलेला नाही.

बिश्नोईवर खून आणि खंडणीसह दोन डझनहून अधिक गुन्हे

बिश्नोईवर खून आणि खंडणीसह दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. २०२१ मध्ये त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात त्याला भरतपूर कारागृहातून दिल्लीतील तिहार कारागृहात स्थानांतरित करण्यात आले.

२३ ऑगस्ट २०२३ रोजी, गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने बिश्नोईला पंजाब पोलिसांकडून ताब्यात घेतले. सप्टेंबर २०२२ मध्ये गुजरात किनारपट्टीवरील एका पाकिस्तानी बोटीतून २०० कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी त्याची भटिंगा तुरुंगात चौकशी सुरू होती. सध्या तो गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे.