पीटीआय, भुवनेश्वर
भुवनेश्वरमधील पोलीस कोठडीत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेला न्याय मिळावा, या मागणीसाठी ओडिशातील विरोधी पक्ष बिजू जनता दल (बीजेडी) आणि काँग्रेसने शनिवारी आंदोलन केले. बिजू जनता दलाच्या महिला शाखेतर्फे राजभवनासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, तर काँग्रसने मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या निवासस्थानासमोर घेराव घालत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
भुवनेश्वरमधील भरतपूर पोलीस ठाण्यात लष्करी अधिकारी आणि त्याच्या महिला सहकाऱ्याच्या कथित छळाची न्यायालयीन देखरेखीखाली ‘एसआयटी’ आणि न्यायालयीन चौकशीची मागणी बिजू जनता दलातर्फे करण्यात आली. शनिवारी फलक आणि बॅनर घेऊन ‘बीजेडी’च्या शेकडो महिला सदस्यांनी राज्यपालांच्या घराबाहेर धरणे धरले. यावेळी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे सरकार रहिवाशांचे, विशेषत: महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. या वेळी पक्षाच्या वतीने ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आले.