ओरिसातील बिजू जनता दलाच्या सरकारने अनेक घोटाळे केल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. केंद्राच्या निधीच्या दुरुपयोग नवीन पटनाईक सरकारने केल्याची टीका त्यांनी केली. तसेच सरकार खाण माफियांना सामील झाल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी येथील सभेत केला.
केंद्राने दिलेला निधी प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहोचलाच नाही, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले. नैसर्गिक साधनसंपत्तीची वारेमाप लूट करण्यात आली. काही थोडय़ा लोकांनाच याचा फायदा झाला. केंद्राने दिलेल्या निधीची लूट करण्यात आली. दारिद्रय़रेषेखालील जनतेसाठी आलेला तांदूळही सरकारने दुसरीकडे दिला, अशी टीका राहुल यांनी केली. विकासाच्या अभावी राज्यात नक्षलवाद वाढत आहे. तसेच चिटफंड घोटाळ्यांचा उल्लेख, राज्य सरकारने याबाबत काहीच कारवाई केली नसल्याची टीका त्यांनी केली. आदिवासी आणि दलितांच्या हक्कासाठी राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघर्ष करावा, असे आवाहन राहुल यांनी केले. त्यापूर्वी राहुल यांनी भुवनेश्वरपासून रोड शोमध्ये सहभाग घेतला. सत्तेतून बिजू जनता दलाला खाली खेचावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, राहुल यांच्या भाषणावर बिजू जनता दलाने टीका केली आहे. राज्याबाबत राहुल यांना काहीही माहिती नाही. राज्यातील नेत्यांनी जे सांगितले त्यावर आधारित त्यांनी भाषण केल्याचे आरोग्यमंत्री दामोदर राऊत यांनी सांगितले.

Story img Loader