केंद्र सरकारविरोधात आंध्र प्रदेशच्या सदस्यांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन देण्याचे संकेत बिजू जनता दलाने दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्ताव चर्चेला येण्यासाठी किमान पन्नास सदस्यांचे समर्थन गरजेचे आहे. या प्रस्तावाला ८४ सदस्यांनी समर्थन दिले असल्याचा दावा तेलगू देसमच्या सदस्यांनी केला आहे. आजच त्यावर चर्चा होणार होती, मात्र गोंधळामुळे कामकाज दिवसभर तहकू ब झाले.
लोकसभेत बिजू जनता दलाचे १४ सदस्य आहेत. अविश्वास ठरावाला समर्थन देण्याऱ्यांची संख्या आता अठरावर पोहोचली आहे. सीमांध्र भागातील काँग्रेस व तेलगू देसम पक्षाच्या प्रत्येकी चार, तर वायएसआर काँग्रेसच्या तीन सदस्यांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची नोटीस लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना दिली होती. लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार हा प्रस्ताव मंगळवारी सभागृहासमोर ठेवणार होत्या. मात्र जेपीसी अहवालावरून भाजप व द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी सभापतींसमोर सज्जात येऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तासाभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ कायम राहिला. या गोंधळातच मीरा कुमार यांनी अविश्वास प्रस्ताव मांडणार असल्याचे सभागृहास सांगितले. त्यावर आपापल्या सदस्यांना जागेवर बसण्याचा सूचना वरिष्ठ नेत्यांनी केली. काही सेकंद सभागृहात शांतता निर्माण झाली. मात्र द्रमुक सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजी केल्याने मीरा कुमार यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा