महेश सरलष्कर, लोकसत्ता
नवी दिल्ली : दिल्लीतील सातपैकी सर्वात लक्षवेधी ठरलेल्या उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे युवा नेते कन्हैय्या कुमार यांच्यामुळे ‘इंडिया’ आघाडी भाजपचे विद्यामान खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरली आहे. काँग्रेसपेक्षा ‘आप’च्या मदतीने कन्हैय्या कुमार हे मतदारसंघातील गल्लीबोळ फिरून मतदारांशी संपर्क करत असले तरी, २०१९ मध्ये तिवारींना मिळालेल्या ५४ टक्के मतांवर मात करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये १० विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी ७ ‘आप’कडे तर, ३ भाजपकडे आहेत. विधानसभेतील ताकद पाहिली तर सलग दोनवेळा खासदार झालेल्या मनोज तिवारींविरोधात कन्हैय्या कुमार तगडी लढत देऊ शकतात. मात्र, कन्हैय्या कुमारांकडे पक्ष संघटना, आर्थिक ताकद व इतर कुमक यांचा अभाव आहे. ‘दिल्लीत काँग्रेसची संघटना कमकुवत असून दहा वर्षांमध्ये कार्यकर्ते ‘आप’मध्ये सामील झाले आहेत, असे कन्हैय्यांच्या सहकाऱ्याचे म्हणणे आहे. काँग्रेसवर कन्हैय्यांना अवलंबून राहता येत नाही. वैयक्तिक करिष्मा आणि ‘आप’च्या कार्यकर्त्यांच्या मदतीवर त्यांची सगळी मदार आहे. म्हणूनच ‘आप’चे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी रोड शो घेतले, त्यामध्ये कन्हैय्या कुमार सहभागी झाले होते.
हेही वाचा >>>मोदींच्या भाषणांत विकासापेक्षाही काँग्रेस, ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवर जोर; पाच टप्प्यांत १११ भाषणे
दिल्लीत काँग्रेस उत्तर-पूर्व, उत्तर-पश्चिम (उदित राज) व चांदनी चौक मतदारसंघ (जयप्रकाश अगरवाल) अशा तीन जागा लढवत आहेत तर, अन्य चार जागांवर ‘आप’चे उमेदवार उभे आहेत. काँग्रेसच्या तीनही उमेदवारांच्या घोषणेला विलंब झाला. ‘कन्हैय्या कुमार यांचे नाव अचानक घोषित झाल्यामुळे झारखंडमधील प्रचार सोडून त्यांना दिल्लीत परतावे लागले. त्यांची उमेदवारी तुलनेत आधी जाहीर झाली असती तर अधिक व्यापक संपर्क करता आला असता. आमच्या मतदारांची नावे यादीत आहेत की नाही, याची खात्री करून घेण्यापासून आम्हाला तयारी करावी लागत आहे’, असे कन्हैय्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांचा स्वत:चा करिष्मा असून त्यांच्याकडे भाजपची सक्षम संघटनाही आहे. या मतदारसंघात मूळ पूर्वांचली मतदारांची संख्या निर्णायक असून दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी तिवारींना पाठिंबा दिला होता. शिवाय, २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींकडे पाहून मतदारांनी भाजपला मते दिली होती. यावेळीही तिवारी विजयासाठी याच मुद्द्यांवर अवलंबून आहेत. पण, कन्हैय्या कुमारही पूर्वांचली असल्यामुळे या मतांची विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ‘पूर्वांचलींचे घटणारे एक-एक मत तिवारींचे नुकसान करेल. यावेळी मुस्लीम-दलितही कन्हैय्या कुमारांना मते देतील, त्यामुळे ’त्यांचेे पारडे जड आहे’, असे मत घोंडाचे स्थानिक रहिवासी व ‘आप’समर्थक शिवराज शर्मा यांनी व्यक्त केले.
विधानसभेतील ताकद पाहिली तर सलग दोनवेळा खासदार झालेल्या मनोज तिवारींविरोधात कन्हैय्या कुमार तगडी लढत देऊ शकतात. मात्र, कन्हैय्या कुमारांकडे पक्ष संघटना, आर्थिक ताकद व इतर कुमक यांचा अभाव आहे.
जातींचे गणित
उत्तर-पूर्व मतदारसंघामध्ये दलित १६ टक्के, मुस्लीम २१ टक्के, ओबीसी २२ टक्के, गुर्जर ८ टक्के, ब्राह्मण ११ टक्के, बनिया ५ टक्के, पंजाबी ४ टक्के मतदार आहेत. दलित-मुस्लिमांप्रमाणे काँग्रेससाठी गुर्जर मतेही महत्त्वाची असल्याने या मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून सचिन पायलट यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पायलट सहभागी झाल्याचेही दिसले. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिल्लीतील प्रचाराची सुरुवात केली होती.
ध्रुवीकरणाचा भाजपला लाभ?
पाच वर्षांपूर्वी हनुमान जयंतीला ईशान्य दिल्लीतील काही भागांमध्ये हिंदू-मुस्लीम दंगली झाली होती. त्यानंतर या मतदारसंघामध्ये ध्रुवीकरण झाले असून भाजप लाभ उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस व आपकडून केला जात आहे. भाजपचे मनोज तिवारी, ही लढाई ‘तुकडे-तुकडे टोळी’ विरुद्ध ‘भारत माता’ असल्याचा प्रचार करत आहेत. कन्हैय्यांवर काही समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला तिवारी जबाबदार असल्याचा आरोप कन्हैय्यांनी केला.
१२ टक्क्यांचा फरक : २०१९ मध्ये तिवारींना ७ लाख ८८ हजार मते मिळाली होती. काँग्रेसच्या शीला दीक्षित यांना ४ लाख २१ हजार मते तर आपचे दिलीप पांडे यांना २ लाख मते मिळाली होती. काँग्रेस व आप यांना अनुक्रमे २९ व १३ टक्के म्हणजे एकूण ४२ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे कन्हैय्या कुमार यांना विजयी होण्यासाठी १२ टक्के मतांचा फरक भरून काढावा लागणार आहे.
© The Indian Express (P) Ltd