नवी दिल्ली : भाजपने शनिवारी ‘आप’च्या आमदार आतिशी यांना ‘खलनायिका’ संबोधत दिल्ली महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान गोंधळ घातल्याचा आरोप केला.
आमदार आतिशी, दुर्गेश पाठक आणि दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांचे छायाचित्र लावलेला चित्रपटाचा फलक दिल्ली भाजपने ‘ट्वीट’ करून नमूद केले, की दिल्ली महापालिका सभागृहात हिंसाचार आणि हुकूमशाही करणाऱ्या ‘आप’च्या या खलनायिका!
महापालिकेच्या महत्त्वाच्या स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडणुकीत महापौर शेली ओबेरॉय यांनी एक मत अवैध ठरविल्यानंतर भाजप व ‘आप’च्या सदस्यांत बाचाबाची झाली. भाजप नगरसेवकांनी उच्च रवात निषेध नोंदवला. गोंधळाचे रुपांतर धक्काबुक्की-हाणामारीत झाले. अशोक मनू नावाचे नगरसेवक कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापौरांना सभागृह तहकूब करावे लागले. भाजप व आप या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले. एका चित्रफितीत दोन्ही पक्षांचे नगरसेवक सभागृहात एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या व सफरचंद फेकताना दिसत आहेत. तर दुसऱ्या चित्रफितीत महिला सदस्य एकमेकांना मारताना दिसत आहेत. सभागृहाचे कामकाज २७ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केले आहे.
पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी
दरम्यान, नगरसेवकांतील या धक्काबुक्की-हाणामारीप्रकरणी आप व भाजप या दोन्ही पक्षांनीही दिल्ली पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. पोलिसांकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या आहेत. पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.