पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मतदारसंघातील जनतेला भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपने केल्याने गुरुवारी राज्यसभेत भाजप आणि वर्मा यांच्यात चांगलीच चकमक झडली.
देशातील पोलाद उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पोलाद ग्राहक परिषदेने ३ फेब्रुवारी रोजी लखनऊ येथे एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीसाठी १.७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे समर्थन वर्मा यांनी केले.
भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या परिषदेमुळे सत्तेचा गैरवापर होण्याचा आणि लाच देण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने सरकार त्याची चौकशी करणार का, अशा सवालही जावडेकर यांनी केला.
वर्मा यांनी याच कार्यक्रमात आपल्या मतदारसंघातील एक हजार लोकांना भ्रमणध्वनी, भेटवस्तू आणि रोख रकमेचे वाटप केले, त्याचा वाढत्या पोलाद उत्पादनाशी सुतराम संबंध नाही, असे जावडेकर म्हणाले. त्याला उत्तर देताना वर्मा यांनी, या कार्यक्रमासाठी १.७५ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले.
भारताची पोलाद उत्पादन क्षमता २०२५ पर्यंत ३०० मे. टनापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जात असून सदर बैठक त्याचाच एक भाग होती, असे वर्मा म्हणाले. मात्र या बैठकीला ज्यांना निमंत्रित करण्यात आले होते त्यांचा पोलाद उद्योगाशी काडीचाही संबंध नाही, असे जावडेकर म्हणाले.