BJP advises Brij Bhushan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते, माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू विनेश फोगटने वर्षभरापूर्वी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. वर्षभर ठराविक अंतराने विनेश फोगट आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिल्लीत ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद तर गमवावे लागलेच, शिवाय भाजपाने २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांना तिकीटही नाकारले. आता हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने काँग्रेसमध्ये प्रवेश करताच ब्रिजभूषण हे त्यांच्याविरोधात कडवी टीका करत आहेत. मात्र हरियाणामध्ये आधीच अडचणीत सापडलेल्या भाजपाला अधिक नुकसान होऊ नये, त्यामुळे ब्रिजभूषण यांना कुस्तीटूंच्या विरोधात काहीच न बोलण्याची समज भाजपाच्या वरिष्ठांनी दिली असल्याचे बोलले जात आहे.

विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने काँग्रेसमध्ये प्रवेश करताच ब्रिजभूषण सिंह यांनी दोघांवर टीका केली होती. त्यानंतर भाजपाच्या वरिष्ठांनी त्यांना कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याची समज देण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ब्रिजभूषण म्हणाले होते की, विनेश आणि बजरंगने कुस्तीच्या माध्यामतून नाव कमावले आणि खेळाच्या माध्यमातूनचे ते मोठे झाले. पण काँग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांचे नाव मातीत जाणार आहे.

हे वाचा >> Vinesh Phogat : “ऑलिम्पिकसाठी विनेश फोगटची अवैधरित्या निवड झालेली”, बृजभूषण शरण सिंहांचा मोठा दावा; म्हणाले, “५० व ५३ किलो वजनी गटात…”

विनेशचा पराभव निश्चित

ब्रिजभूषण सिंह पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “हरियाणा विधानसभा निवडणुकीला उभे राहून विनेश आणि बजरंगचा विजय होईल, हे त्यांचे दिवास्वप्न आहे. विनेशने हरियाणामधील कोणत्याही मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहावे. भाजपाचा एखादा छोटासा कार्यकर्ताही तिचा पराभव करेल.” विशेष म्हणजे ब्रिजभूषण यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेसने जुलाना विधानसभा मतदारसंघासाठी विनेश फोगट यांची उमेदवारी जाहीर केली.

Vinesh Phogat and Bajrang Punia joins congress
विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला कसा फायदा होणार? (Photo – PTI)

दुसरीकडे बजरंग पुनियाची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तो सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहे. निवडणूक लढविण्याबाबत त्याने किंवा काँग्रेसने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

हे ही वाचा >> Vinesh Phogat : गावची खेळाडू सून राजकीय आखाड्यात; विनेश फोगटच्या सासरची मंडळी म्हणतात, “तिच्या लग्नावेळी…”

६ सप्टेंबर रोजी विनेश आणि बजरंगने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना तिने सांगितले की, आम्ही वर्षभर महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आंदोलन करत होतो. पण त्यावेळी भाजपाने ब्रिजभूषण सिंह यांची बाजू उचलून धरली. तर काँग्रेसने आंदोलक कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आम्हाला दिल्लीच्या रस्त्यांवर फरफटत नेले गेले. विनेशची री ओढत बजरंग पुनियाने सांगितले की, आमच्या कठीण काळात काँग्रेस आमच्या पाठीशी ठामपणे उभी होती.

तर ब्रिजभूषण सिंह यांनी याबाबत प्रत्युत्तर देताना म्हटले की, कुस्तीपटूंचे आंदोलन हे काँग्रेसने रचलेले एक षडयंत्र होते.

Story img Loader