नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंब नसल्याचे वादग्रस्त विधान करून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी रविवारी भाजपच्या हाती कोलित दिले. त्यानंतर सोमवारी केंद्रातील सत्ताधारी पक्षाने ‘मोदी का परिवार’ या नावाने नवी देशव्यापी मोहीम सुरू करून प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील १४० कोटी देशवासी माझे कुटुंब असल्याचा पलटवार मोदींनी तेलंगणातील अदिलाबाद येथील जाहीरसभेत केला.  या सभेत मोदींनी, ‘तुम्ही मोदींचे, मोदी तुमचे’ अशी नवी घोषणा दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’विरोधात भाजपची हीच प्रमुख प्रचार घोषणा असेल. 

‘‘विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील नेते भ्रष्टाचार, घराणेशाही, लांगूनचालनामध्ये गुंतलेले असून त्यांच्याविरोधात केंद्राने मोहीम उघडल्यामुळे त्यांना अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे. त्यांच्या घराणेशाहीला मी आव्हान देतो तेव्हा ते मोदींचे कुटुंब नाही असे सांगून माझ्यावर हल्लाबोल करतात’’, अशी टीका मोदी यांनी अदिलाबादमधील सभेत केली.

हेही वाचा >>>३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी! निवडणूक रोख्यांचा सविस्तर तपशील, स्टेट बँकेचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

रविवारी पाटणा येथे ‘इंडिया’च्या ‘जन विश्वास महारॅली’मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर टीका केली होती. ‘‘मोदी घराणेशाहीच्या राजकारणावर बोलतात, पण, घराणेशाहीचे राजकारण म्हणजे काय हे त्यांना कसे माहिती असणार? जास्त मुले झालेले कुटुंब हे चेष्टेचा विषय ठरतात. मोदींना तर मुलेही नाहीत’’, अशी आक्षेपार्ह टिप्पणी लालूप्रसाद यादव यांनी केली. ही टिप्पणी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. 

भाजप नेत्यांच्या डीपीमध्ये बदल

भाजपच्या नेत्यांनी तातडीने ‘एक्स’वरील आपापल्या खात्याचे डीपी बदलले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, अनुराग ठाकूर, स्मृति इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेत्यांच्या ‘एक्स’ खात्यावर ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाइन दिसू लागली आहे.

‘प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न’

भाजपची ‘मोदी मेरा परिवार’ ही मोहीम म्हणजे खऱ्या समस्यांकडून लोकांचे लक्ष भरकटण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सोमवारी केली. इंडिया आघाडी वाढत असल्यामुळे भाजपचे लोक चिडले असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून अशा युक्त्यांचा वापर केला जात आहे असे ते म्हणाले.

देशातील १४० कोटी देशवासी माझे कुटुंब आहेत. या देशातील कोटय़वधी माता-कन्या, भगिनी या मोदींचे कुटुंब आहेत. देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती मोदींच्या कुटुंबाचा भाग आहे. ज्यांना कोणी नाही ते सर्व मोदींचेच कुटुंब आहेत आणि मोदी त्यांचे आहेत.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

उपेंद्र रावत, पवन सिंह आणि ब्रिजभूषण शरण सिंह या लोकांनी त्यांच्या परिचयामध्ये ‘मोदी का परिवार’ जोडण्याची वाट पाहत आहे.  –पवन खेरा, काँग्रेस माध्यम विभाग प्रमुख

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp aggressive after lalu prasad yadav criticism amy
Show comments