लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता डाव्या विचारसरणीने प्रभावित ‘एनजीओ’ संस्कृतीच्या विरोधात आघाडी उघडली आहे. एनजीओ संस्कृतीशी चार हात करण्यासाठी भाजपने कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली प्रदेशच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत भाजप कार्यकर्त्यांना खास स्वयंसेवी संस्थांच्या आव्हानावर ‘बौद्धिक’ आयोजित करण्यात आले होते. दिल्लीचे प्रभारी व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम जाजू या सत्रात म्हणाले की, भाजपसमोर यापूर्वी काँग्रेस व डाव्या पक्षांचे आव्हान होते. पण आता याच विचारांनी प्रभावित स्वयंसेवी संस्थांचे आव्हान आहे.
डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली असलेल्या स्वयंसेवी संस्थांना रोखून त्यांचे खरे स्वरूप देशवासीयांसमोर आणण्याचे आवाहन जाजू यांनी केले. केंद्र सरकारने सत्तास्थापनेनंतर ‘ग्रीन पीस’ या संस्थेवर बंदी घातली होती. पर्यावरणविषयक समस्यांवर काम करणाऱ्या संस्था विकासाला बाधक ठरतात, असा युक्तिवाद भाजपकडून वारंवार केला जातो.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संपुआ सरकारविरोधात छेडलेल्या आंदोलनानंतर ‘सिव्हिल सोसायटी’ व अनेक स्वयंसेवी संस्थांनी राजकारण ढवळून काढले. याच आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने राष्ट्रीय राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे पानिपत केले होते. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांविरोधात भाजपने कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले.
दिल्ली प्रदेशने आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात दहा सत्र आयोजित करण्यात आली
आहेत. ज्यात भाजपचा इतिहास, ज्येष्ठ नेत्यांची कामगिरी, राजकीय विचारधारेचा विकास, कार्यकर्त्यांसमोरील आव्हाने आदी विषयांवर दररोज ‘बौद्धिक’ देण्यात येत आहे.
‘एनजीओ’ संस्कृतीविरोधात भाजप आक्रमक!
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता डाव्या विचारसरणीने प्रभावित ‘एनजीओ’ संस्कृतीच्या विरोधात आघाडी उघडली आहे.
First published on: 09-08-2015 at 01:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp aggressive against ngo culture