चेन्नई, नवी दिल्ली : तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन  यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून केंद्रातील सत्तारुढ भाजपने तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी उदयनिधी, द्रमुक यांच्यावर प्रखर टीका करतानाच द्रमुक सहभागी असलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीला प्रामुख्याने लक्ष्य केल्याचे दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 ‘‘सनातन धर्म हा समता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात असून, तो संपवला पाहिजे,’’ असे मत तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमच्या (द्रमुक) युवक शाखेचे सचिव आणि राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी व्यक्त केले.  हे मत व्यक्त करताना उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना करोना विषाणू, मलेरिया, डेंग्यू आदी डासांमुळे होणाऱ्या रोगांच्या जंतूंशी केली. या रोगजंतूंना केवळ विरोध न करता ते नष्ट केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुपुत्राने सनातन धर्माची केली डेंग्यू अन् मलेरियाशी तुलना; भाजपाकडून टीकास्र

तमिळनाडू प्रगतिशील लेखक आणि कलाकार संघाच्या शनिवारी येथे झालेल्या मेळाव्यास तमिळमध्ये संबोधित करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातनला विरोध’ऐवजी ‘सनातन निर्मूलन’ हा मेळाव्याचा विषय निवडल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली. उदयनिधी म्हणाले, की काही गोष्टींना नुसता विरोध करून भागत नाही. परंतु त्या हटवल्याच पाहिजेत. त्यांनी सनातन धर्माचा उल्लेख ‘सनातनम’ असा केला. ‘सनातनम’ काय आहे? हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. समानता आणि सामाजिक न्यायाविरुद्ध असा हा ‘सनातन’ शब्द आहे. ‘सनातन’चा अर्थ काय? जे शाश्वत आहे, जे बदलता येत नाही, कोणीही त्याबाबत प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असाच त्याचा अर्थ आहे. ‘सनातन’ने लोकांमध्ये जातीपातींची फूट पाडल्याचा आरोपही त्यांनी केला. हे सर्व बदलले पाहिजे आणि काहीही शाश्वत नसते. डाव्या चळवळी आणि ‘द्रमुक’ची स्थापना या सर्व मुद्दय़ांच्या विरोधात प्रश्न उपस्थित करण्यासाठीच झाली आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> Aditya L1 Mission: ‘आदित्य एल १’ची पहिली प्रक्रिया यशस्वी; पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पुढील कृती उद्या

भाजप आक्रमक  

उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने रविवारी जोरदार टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’चा हिंदू धर्माचे संपूर्ण उच्चाटन करणे हेच धोरण दिसत असल्याचा आरोपही भाजपने यावेळी केला.  उदयनिधींच्या वक्तव्याला ‘द्वेषमूलक चिथावणीखोर भाषण’ संबोधून भाजपने सर्वोच्च न्यायालयाने कायद्यानुसार कारवाई करण्याचे आवाहन केले. 

दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, की उदयनिधी यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांचे वास्तव स्वरूप उघड झाले आहे.   काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांची युती असलेल्या ‘इंडिया’चा अप्रत्यक्ष उल्लेक करत त्रिवेदी म्हणाले, द्रमुक नेत्याचे वक्तव्य मुंबईत झालेल्या गर्विष्ठ (घमंडिया) आघाडीच्या बैठकीनंतर ४८ तासांच्या आत आले. त्यामुळे ‘प्रेमाच्या दुकानदारांह्णचे वास्तव चरित्र उघड झाले. हिंदू धर्म, सनातन धर्माचे पूर्ण निर्मूलन करणे, हेच त्यांचा प्राथमिक धोरण आहे.

हेही वाचा >>> काश्मीर, अरुणाचल आमचेच!; चीन, पाकिस्तानला पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले

 उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून समाजमाध्यमांवर गदारोळ उठला आहे. भाजपचे माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी नमूद केले, की द्रमुक नेते उदयनिधी यांनी सनातन धर्म मानणाऱ्या ८० टक्के जनतेचा ‘नरसंहार’ करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, उदयनिधी यांनी हे आरोप फेटाळून लावत ‘एक्स’वर स्पष्ट केले, की मी कधीही सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचा नरसंहार करण्याचे आवाहन केले नाही. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांत फूट पाडण्याचे सनातन धर्माचे कायमचे तत्त्व आहे.

गंभीर परिणामांचा विहिंपचा इशारा

उदयनिधी स्टॅलिन यांनी याप्रकारची वक्तव्ये टाळावीत, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रविवारी विश्व हिंदू परिषदेने दिला. विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उदयनिधी यांच्या सनातन धर्माबाबतच्या विधानावर तमिळनाडूतील द्रमुक सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. या सरकारला हे विचार मान्य आहेत काय, ते स्पष्ट झाले पाहिजे. जर राज्य सरकारला हे विचार मान्य असतील, तर आम्ही केंद्राला विनंती करू की, लोकांना त्यांच्या धर्माचे अनुसरण करण्याच्या अधिकाराचे तमिळनाडूत रक्षण केले जावे.

‘लांगूनचालनाच्या राजकारणातून धर्माचा अपमान’

जयपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही विरोधी आघाडी ‘इंडिया’ आणि उदयनिधी  यांच्यासह त्यांच्या पक्षांवर मतांचे राजकारण आणि लांगूलचालनाच्या राजकारणासाठी ‘सनातन धर्मा’चा अपमान केल्याचा आरोप केला. राजस्थानमधील सभेत शाह यांनी ‘इंडिया’ आघाडीचे वर्णन ‘घमंडिया आघाडी’ असे केले. ते म्हणाले की, ही आघाडी एकगठ्ठा मतांसाठी कोणत्याही थराला जाऊन राजकारण करू शकते. परंतु ते जेवढे सनातन धर्माच्या विरोधात बोलतील, तितकेच ते घटत जातील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp aggressive over dmk leader udayanidhi stalin statement ysh