‘बंगळुरुमध्ये भाजप कार्यालयासमोर बॉम्बस्फोट झाला असेल तर त्याचा भाजपला निवडणुकीत निश्चितच राजकीय लाभ होईल,’ असे काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनी ट्विट केल्यामुळे नवे वादंग निर्माण झाले आहे. अहमद यांचे मत वैयक्तिक असून त्याच्याशी पक्षाचा संबंध नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. निदान दहशतवादावर राजकारण होऊ नये, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनीही अहमद यांना असाच सल्ला दिला.
दिवसभर चौफेर टीकेला सामोरे जाणारे शकील अहमद यांनी सायंकाळी पुन्हा ट्विट करीत आपल्या भूमिकेचे समर्थन केले. ‘आमच्या कार्यालयापाशी झालेल्या बॉम्बस्फोटाचे उद्दिष्ट निवडणुकीसाठी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांंना ठार करण्याचे होते, असे कर्नाटकचे गृहमंत्री आर. अशोक यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपविषयी सहानुभूती निर्माण होईल,’ असे अहमद यांनी पुन्हा ट्विट केले. देशात जेवढे बॉम्बस्फोट झाले, त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला काय? असा सवाल भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसैन यांनी केला. बॉम्बस्फोटांचा फायदा काँग्रेसलाच मिळत असतो, असे हुसैन म्हणाले.

Story img Loader