* काँग्रेसच्या इशाऱ्यानुसार सीबीआयचे काम-राजनाथ सिंह
*  कटारियाप्रकरणी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न
सोहराबुद्दिन शेख चकमकप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते गुलाबचंद कटारिया यांच्यावर केंद्रीय गुन्हाअन्वेषण विभागाने (सीबीआयने) आरोपपत्र दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी, बुधवारी भाजपने दिल्लीत पत्रकार परिषदेत सीबीआयवर जोरदार हल्ला चढवला. सीबीआय भाजप सदस्यांना खोटय़ा आरोपांत गुंतविण्यासाठी काँग्रेसच्या इशाऱ्यानुसार काम करीत असून सीबीआयमधील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना ही शुद्ध धूळफेक आहे, असा आरोप भाजपने केला.
राजस्थान विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले कटारिया यांची जोरदार पाठराखण करताना भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले की, सीबीआय आणि काँग्रेस पक्ष यांच्या कटकारस्थानांचा आम्ही राजकीय आणि कायदेशीर या दोन्ही मार्गानी सामना करणार आहोत.
कोळसा खाणवाटप भ्रष्टाचार तपासाचा स्थितीदर्शक अहवाल केंद्रीय कायदामंत्र्यांना दाखवल्यावरून सीबीआयवर आधीच सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर सीबीआयला स्वायत्तता देण्यासाठी केंद्राने मंत्रीगट स्थापला आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने सीबीआयवर हा हल्ला चढविला आहे.
या पत्रकार परिषेदेत भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षा वसुंधरा राजे शिंदे आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनीही सीबीआयवर टीका केली. कटारियांच्या विश्वासार्हतेबद्दल कुणालाच शंका नाही. त्यांच्याविरोधातील आरोप हे सीबीआयचे कुभांड आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना गोवण्याच्या काँग्रेसच्या मनसुब्यासाठी सीबीआय ही धडपड करीत आहे.    जेटली यांनी सांगितले की, सोहराबुद्दिनप्रकरणी सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. सोहराबुद्दिन मारला गेला तेव्हा कटारिया हे राजस्थानचे गृहमंत्री होते, एवढय़ा आधारावरून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न या पुरवणी आरोपपत्राद्वा त्यांनी केला आहे. सीबीआयच्या ढोंगीपणाचा हा तिसरा प्रकार आहे. याआधी गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांनाही सोहराबुद्दिन प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या एका चकमकीवरून राजेंद्र राठोड यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. शहा यांच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनाच अडकविण्याचा सीबीआयचा डाव होता. रेल्वे भ्रष्टाचारप्रकरणात रेल्वेमंत्री बन्सल यांच्याविरोधात शेकडो पुरावे असताना सीबीआय त्यांच्याबाबत कमालीची मवाळ आहे. पण कोणतेही पुरावे नसताना भाजप नेत्यांना अडकवू पहात आहे, असा आरोपही जेटली यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा