बिजू जनता दलालाही ‘एनडीए’मध्ये आणण्याचे प्रयत्न
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आगामी लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील अशी घोषणा केल्यानंतर, भाजपने ‘एनडीए’च्या मजबुतीकरणाची मोहीम हाती घेतली असून शुक्रवारी आंध्र प्रदेशमधून तेलुगु देसम व जनसेना हे दोन प्रादेशिक पक्ष ‘एनडीए’मध्ये सामील झाले आहेत.
२०१९ मध्ये भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेणारे चंद्राबाबू २०२४ मध्ये मात्र भाजपच्या ‘एनडीए’मध्ये पुन्हा सहभागी होत भाजपेतर पक्षांविरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगु देसमने पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाशी आघाडी केली आहे. आंध्र प्रदेशातील या प्रादेशिक आघाडीने केंद्रीय स्तरावर भाजपशी युती केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दोन्ही नेत्यांनी दिल्लीत सविस्तर बोलणी केली. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल सहा वर्षांनंतर तेलुगु देसमचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे.
हेही वाचा >>> जंटकडून विद्यार्थी व्हिसाचा गैरवापर; रशियातील युद्धामधील भारतीयांसंबंधी सीबीआय तपासात खुलासा
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ व विधानसभेच्या १७५ जागा आहेत. तिन्ही पक्षांची युती विधानसभा निवडणुकीतही एकत्रित लढण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ८-१० जागांची मागणी केली आहे. मात्र, जागावाटपावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. भाजपला ५-७ जागा देण्याची तयारी तेलुगु देसमने दाखवल्याचे सांगितले जाते.
बिजू जनता दलही ‘एनडीए’मध्ये?
२००९ मध्ये ‘एनडीए’ सोडून गेलेल्या बिजू जनता दलालाही ‘एनडीए’मध्ये आणण्याचे प्रयत्न भाजप करत असून ओदिशातील प्रमुख राजकीय सत्ताधारी पक्षाशी स्वतंत्रपणे बोलणी केली जात असल्याचे सांगितले जाते. १५ वर्षांनंतर भाजप व बीजेडी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. ओदिशामध्ये लोकसभेच्या २१ तर विधानसभेच्या १४७ जागा आहेत. ही संभाव्य युती दोन्ही पक्षांसाठी फायद्याची ठरणार आहे. भाजपला केंद्रात अधिकाधिक जागा मिळवायच्या आहेत. तर बीजेडीला ओडिशात सलग सहाव्यांदा निवडून यायचे आहे. लोकसभेसाठी भाजपला मदत केली तर, विधानसभेसाठी भाजपची मदत घेता येईल, असे गणित बीजेडीकडून मांडले जात आहे.
‘एनडीए’तील भाजपचे नवे सहकारीबिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल (सं.), जितन मांझी यांचा हिंदुस्थान आवामी मोर्चा, उत्तर प्रदेशमध्ये ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाजपक्ष, संजय निषाद यांचा निषाद पक्ष, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल, पंजाबमध्ये अकाली दलाशी युती करण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे सांगितले जाते.