विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यामुळे भारतीय संघाबरोबरच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचीही निराशा झाली आहे. मात्र, एकीकडे खेळाडू या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असताना अंतिम सामन्यातील पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीवरून राजकीय वर्तुळात वेगळाच सामना सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामन्याला उपस्थित होते, म्हणून भारताचा पराभव झाला, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यांचा उल्लेख ‘पनवती’ म्हणूनही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडूनही एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यावर राहुल गांधींनाच उलट प्रश्न करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा उल्लेख करून मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. “आपली मुलं चांगल्या पद्धतीने विश्वचषक जिंकले असते. पण तिथे पनवतीमुळे आपण हरलो. टीव्हीवाले हे नाही सांगणार की कोण पनवती, पण जनतेला ते माहिती आहे”, असं राहुल गांधी म्हणाले. याचा व्हिडीओही काँग्रेसकडून एक्सवर (ट्विटर) शेअर करण्यात आला आहे.

“पनवती! मोदींमुळे भारत हरला”, राहुल गांधींचा हल्ला; भाजपाचं प्रत्युत्तर…

१९८२ चा अंतिम सामना आणि इंदिरा गांधींची उपस्थिती!

दरम्यान, काँग्रेसच्या या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यासंदर्भात एक जुना व्हिडीओ शेअर करून त्यावरून राहुल गांधींना खोचक प्रश्न केला आहे. पाकिस्तानच्या हॉकी संघातील एका सदस्याच्या एका मुलाखतीमधला हा व्हिडीओ असून १९८२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अंतिम सामन्याचा प्रसंग ते मुलाखतीत सांगताना दिसत आहेत.

“आम्ही भारतात आशियाई क्रीडा स्पर्धा खेळलो. तो आमच्यासाठी संस्मरणीय क्षण होता. दिल्लीत १९८२ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आम्ही भारताविरुद्ध अंतिम सामना खेळलो. त्या सामन्याला त्यांच्या पंतप्रधान इंदिरा गांधीही उपस्थित होत्या. त्या असताना आम्ही हा सामना ७-१ ने जिंकला. पाच गोल झाल्यानंतर इंदिरा गांधी निघून गेल्या. भारतात भारताला हरवणं हा आमच्यासाठी मोठा क्षण होता”, असं ते मुलाखतीत सांगत आहेत.

अमित मालवीय यांचा राहुल गांधींना सवाल!

दरम्यान, या व्हिडीओबरोबर अमित मालवीय यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. “ते वर्ष होतं १९८२. नवी दिल्लीमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीचा अंतिम सामना खेळत होता. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. तो सामना भारतानं पाकिस्तानविरुद्ध १-७ असा गमावला. पाकिस्ताननं ५ गोल केल्यानंतर इंदिरा गांधी मैदानातून निघून गेल्या. मग राहुल गांधींच्या मते इंदिरा गांधींना काय म्हणायला हवं?” असा प्रश्न अमित मालवीय यांनी केला आहे.

Live Updates