नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेत आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये शुक्रवारी तुंबळ हाणामारी झाली. स्थायी समिती निवडणुकीत महापौर शेली ओबेरॉय यांनी एक मत अवैध ठरवल्यानंतर हाणामारीला तोंड फुटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गदारोळात ‘आप’चे अशोक मनु हे नगरसेवक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्थायी समिती सदस्य निवडणुकीत एक मत अवैध ठरवण्याची घोषणा महापौर शेली ओबेरॉय यांनी केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. त्यातून दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकमेकांना भिडले.

एका चित्रफितीमध्ये दोन्ही पक्षांचे नगरसेवक सभागृहात एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या आणि सफरचंद फेकताना, तर दुसऱ्या एका चित्रफितीत महिला नगरसेवक सभागृहात एकमेकांना मारहाण करताना दिसतात. काही नगरसेवकांचे कपडेही फाटल्याचे समाजमाध्यमांवर पसरलेल्या चित्रफितींमध्ये दिसते.

पराभवाच्या नैराश्यातून भाजपच्या नगरसेवकांनी महापौर शेली ओबेरॉय यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप ‘आप’च्या आमदार आतिशी यांनी केला, तर ही हाणामारी ‘आप’मुळे झाल्याचा आरोप भाजपचे स्थायी समिती निवडणुकीतील उमेदवार पंकज लुथरा यांनी केला. भाजपच्या गुंडांनी महिला आणि महापौरांवरही हल्ला केला, असे आपचे नगरसेवक अशोक मनु म्हणाले. 

काय घडले?

सहा सदस्यांच्या स्थायी समितीची निवडणूक सकाळी ११ च्या सुमारास सुरू होऊन दुपारी अडीचच्या सुमारास संपली. त्यानंतर १० मिनिटांनी मतमोजणीला सुरुवात झाली. ही प्रक्रिया दोन तासांहून अधिक वेळ चालली. महापौर शेली ओबेरॉय यांनी अवैध मताशिवाय निकाल जाहीर करण्याची घोषणा केली. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. तेथूनच गोंधळ सुरू झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp and aap councillors clash over over mcd standing committee election results zws