दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या गोल डाकखान्याच्या नावाप्रमाणेच गोलाकार इमारतीच्या दिशेने बाबा खडकसिंह मार्गावरून शंभरेक कार्यकर्त्यांचा जथा येत आहे. डोक्यावर भगवी टोपी, त्यावर कमळाचे चिन्ह व ‘मोदी-मोदी’चा गजर सुरू आहे. नूपुर शर्मा यांच्या प्रचारासाठी किरण बेदींचा ‘रोड शो’ होणार आहे. जथ्यात अनेकांच्या पाठीवर बॅगा लटकवलेल्या. अब की बार- किरण की सरकार वगैरेच्या घोषणा दिल्या जात आहेत. गोल डाकखान्यासमोर असलेल्या चर्चसमोरच्या मोकळ्या जागेत हा जथा निर्धारित वेळेत पोहोचतो.
आता प्रतीक्षा आहे ती किरण बेदी यांच्या येण्याची. गर्दी, वाहतूक कोंडीमुळे चाटवाला तिथे घुटमळतो. शाळकरी शोभावीत अशी किरकोळ शरीरयष्टीची जथ्यातील महाविद्यालयीन पोरं-पोरी ‘मोदी-मोदी’ करीत असतात. त्यांना शिस्त दाखवा, नियम मोडू नका, थोडय़ाच वेळात किरणजी येतील, मग आपल्याला पुढे जायचे आहे.. अशा सूचना माइकवरून दिल्या जातात. हा ‘जथा’ काहीसा विसावतो. अख्खा जथाच दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा! त्यांच्यापैकी अनेक जणांची नावे मतदार यादीत नाहीत. नूपुर कधी काळी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी सचिव होत्या. अभाविपशी तेव्हापासून संबंधित. त्यांच्या प्रचारपत्रकावर परिचय, परदेशातील शिक्षणाचा, व्यवसाय व राजकीय प्रवासाचा ठळख उल्लेख असतो. सामाजिक कार्य, आतापर्यंत केलेली लोकोपयोगी कामे वगैरे.. असले फुटकळ उल्लेख त्यांनी छापलेलेच नाहीत. त्या थेट आमदार झाल्यावरच सामाजिक कार्य करणार! त्यांचेही आगमन चर्चसमोर होते. पोराटोरांच्या गर्दीत उत्साह संचारतो. आपल्या विद्यापीठाच्या माजी अध्यक्षाच्या स्वागतासाठी घोषणाबाजी होते.
चर्चसमोरच्याच मोकळ्या पदपथावर राहणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. रात्रभर थंडीमुळे त्यांची झोप झालेली नाही. त्यामुळे दिवसा उन्हात थोडंसं कलंडण्याची त्यांची इच्छा होती. पण किरण बेदींच्या रोड शोमुळे आता त्यांना ‘व्हिटॅमिन सी’ मिळणार नाही. केजरीवाल यांच्या ४९ दिवसांच्या काळात ‘रैन बसेरा’ होता. दिवसभर काम करून रात्री रैन बसेऱ्याच्या सरकारी छताखाली विसावता येत होते. केजरीवाल सत्तेतून गेल्यानंतर रैन बसेरा इतरत्र हटवला गेलाय. लहान जागेत. तेथे बसेऱ्यासाठी मारामारी. चोरीची भीती. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात मुक्काम पोस्ट गोल डाकखान्याशेजारी चर्चसमोरची मोकळी जागा!
पदपथावर राहणाऱ्यांना नूपुर शर्माची पत्रकं दिली जातात. त्यांना वाचता येत नाही. पण कमळ कळतं. अडीच वाजता येणाऱ्या किरण साडेचापर्यंत पोहोचण्याचा निरोप येतो. महाविद्यालयीन पोरं-पोरी इकडे-तिकडे रेंगाळतात! पदपथावरची महिला नूपुर शर्माचं पत्रक हाती धरते. म्हणते- ही बाई पोलीस होती. ही मुख्यमंत्री झाली तर आम्हाला फुटपाथवर राहू देणार नाही. चाटवाल्याला वाटते- कसले घोर अज्ञान त्या महिलेचे! शर्मा-बेदींच्या फोटोतला फरकही कळत नाही! तेवढय़ात ‘मोदी-मोदी’च्या घोषणेत त्या महिलेचा फाटकातुटका आवाज उमटतो- हाथ पर ना, (मन की) बात पर; इस बार ‘झाडू’ पर! जथ्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. कारण कधीही ‘रैन बसेरा’ न पाहिलेला हा जथा कनॉट प्लेसच्या दिशेने कूच करत असतो- किरण बेदींच्या स्वागतासाठी!
चाटवाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा