“देशातील सामान्य नागरिक गर्तेत अडकला आहे. पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत”, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून काँग्रेसच्या वतीनं दिल्लीतील रामलीला मैदानावर हल्लाबोल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा- गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा; नाव आणि चिन्ह काय असणार, घ्या जाणून

भाजपा आणि आरएसएसने देशाचे विभाजन केले

“देशात भाजप सरकार आल्यानंतर सामाजिक वातावरण बिघडलं आहे. भाजपा आणि आरएसएसने देशाचे विभाजन केले. २०१४ पासून भारतात द्वेष आणि संताप वाढत आहे. मोदी सरकार देशातील दोन मोठ्या उद्योगपतींचा फायदा कसा होईल, या उद्देशाने काम करत आहे. मात्र, ‘काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते भाजपा आणि आरएसएसच्या विचारधारेचा एक दिवस पराभव नक्कीच करेल”, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- ‘पंतप्रधानांवर टीका करणं जोखमीचं’ म्हणणाऱ्या SC च्या माजी न्यायमूर्तींना भाजपाने दिलं उत्तर, म्हणाले “हे लोक अभिव्यक्ती…”

भाजपा देश तोडायचं काम करतो, तर काँग्रेस जोडायचं…

“काँग्रेस पक्ष देशाला जोडायचं काम करतो आणि भाजपा पक्ष देश तोडण्याचं काम करतो. देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने देशाला वाचवलं. यूपीए सरकारने देशात मनरेगा योजना आणली नसती, तर देशात हाहाकार माजला असता. आमच्या सरकारने देश व्यवस्थित चालवला. त्यामुळे आज आम्ही भारतीय संविधान आणि देशाला वाचविण्यासाठी लढत आहोत. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते देशाला वाचवू शकतात. काँग्रेस पक्षाची विचारधाराच देशाचा विकास करू शकते. सत्तेत विराजमान झालेले पंतप्रधान मोदी देशाला कमकुवत करत आहेत”. अशी टीकाही त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.

शेतकरी काद्यावरुन हल्लाबोल

मोदीजींनी नोटाबंदी केली. त्याचा गरिबांना फायदा झाला का? गरिबांच्या खिशातून पैसे काढले. गरिबांना सांगितले की हा काळ्या पैशाविरुद्ध लढा आहे. काही महिन्यांनी तुमच्या खिशातून लाखो करोडो रुपये काढण्यात आल्याचे तुम्ही पाहिले. देशातील बड्या उद्योगपतींची कर्जे माफ झाली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही. शेतकऱ्यांवर काळे कायदे आणणार. हे कायदे त्यांच्या फायद्याचे आहेत असे म्हणतील. जर ते शेतकऱ्याच्या हिताचे असेल तर भारतात शेतकरी विरोधात का? असा सवालही त्यांनी केला आहे.

नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवली. शेतकऱ्यांची ताकद मोदींना दिसताच त्यांनी कायदा रद्द केला. जीएसटीबाबतही तेच झाले. काँग्रेसला दुसरा जीएसटी आणायचा होता. भाजपाने जीएसटी बदलला. पाच वेगवेगळे कर लादून छोट्या दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले.

ईडी कारवाईवरुन मोदींवर निशाणा

“आत्ताच कुणीतरी मोदी पंतप्रधान आहेत असं म्हटलं. पण, त्या दोन उद्योगपतींशिवाय, माध्यमांच्या पाठिंब्याशिवाय मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत. मीडिया असो, संस्था असो, सरकार सर्वांवर दबाव आणत आहे. ईडीने मला ५५ तास बसवले. मला मोदीजींना एक गोष्ट समजावून सांगायची आहे की, मी तुमच्या ईडीला घाबरत नाही, मला पर्वा नाही. तुम्ही ५५ तास, ५०० तास किंवा ५ वर्षे ईडी कार्यालयात बसवा, मला काही फरक पडत नाही. संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि ते वाचवण्याचे काम आज प्रत्येक भारतीय नागरिकाला करावे लागणार आहे. हे केले नाही, तर हा देश टिकणार नाही. हा देश संविधान आहे, हा जनतेचा आवाज आहे, हा देश जनतेचे भविष्य आहे”, असेही राहुल गांधी म्हणाले.

Story img Loader