भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीनंतर भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराची घोषणा केली. भाजपाकडून द्रौपदी मोर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील रहिवासी असून त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत.
एनडीकडून राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असावा, यासाठी जवळपास २० नावांवर चर्चा सुरू होती. भाजपाने घटक पक्षांशी संवाद साधल्यानंतर द्रौपदी मोर्मू यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे. याबाबतची माहिती जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज यूपीएने राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार घोषित केला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.
संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर भाजपाने राष्ट्रपती पदाच्या उमदेवाराची घोषणा केली. भाजपा आणि इतर सर्व घटक पक्षाच्या संमतीने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार मिळावा, अशी आमची इच्छा होती. तसेच हा उमेदवार पूर्व भारतातील असावा, महिलेला स्थान मिळावं, अशीही आमची इच्छा असं जेपी नड्डा यांनी सांगितलं.
त्यानुसार एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. द्रौपदी मोर्मू यांनी शिक्षिका म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्या ओडिसा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्या. तसेच त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलं आहे. २०१५ ते २०२१ या कालावधीत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.