काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा विजय झाल्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्या. मात्र, खुद्द त्या नंदीग्राममधून पराभूत झाल्या. त्यांचेच एकेकाळचे सहकारी आणि आता भाजपावासी झालेले सुवेंदू अधिकारी यांनीच त्यांचा पराभव केला. त्यामुळे आता पश्चिम बंगालमधल्या भोवानीपूरमधून पुन्हा एकदा ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. या पोटनिवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाकडून कोण निवडणूक लढवणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पुन्हा एकदा सुवेंदू अधिकारीच ममता बॅनर्जी यांच्या विरोधात लढणार असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं होतं. त्यावर आता भाजपाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

भाजपाचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे राज्यातील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी भोवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढणार नसल्याचं दिलीप घोष यांनी स्पष्ट केलं आहे. “भोवानीपूरमधून भाजपाकडून कुणीतरी दुसरं निवडणूक लढवेल. सुवेंदू अधिकारी यांनी आधीच एकदा ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. एकच व्यक्ती ममता बॅनर्जी यांना अनेकदा का हरवेल? त्यामुळे यावेळी अजून कुणीतरी निवडणूक लढेल”, असं दिलीप घोष यांनी स्पष्ट केलं आहे.

न्यायालयात जाण्याची तयारी?

दरम्यान, भोवानीपूरमध्ये पोटनिवडणूक घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात भाजपा कलकत्ता उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिलीप घोष यांनी यावेळी दिले. त्यासंदर्भात पक्ष सर्व उपायांची चाचपणी करत असल्याचं ते म्हणाले आहेत.

राजकीय हेतूने माझ्याविरोधात तक्रारी – सुवेंदू अधिकारी

दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने सुवेंदू अधिकारी यांना दिलासा दिला आहे. त्यांच्याविरोधात २०१८मध्ये त्यांच्या अंगरक्षकाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांच्यावर तूर्तास कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात त्यांच्याविरोधात पश्चिम बंगालमधील ४ पोलीस स्थानकांमध्ये ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या तक्रारी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Story img Loader