नवी दिल्ली : भाजपमधील संघटनात्मक बदलांमुळे केंद्रीय मंत्र्यांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले. नव्या पदभारामुळे मंत्रिपद गमवण्याच्या शक्यतेमुळे रेड्डी नाराज झाल्याचे सांगितले जाते.
तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि झारखंड या चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले असून अन्य राज्यांमध्येही भाजपच्या संघटनेमध्ये फेरबदल केले जाणार आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विद्यमान केंद्रीय मंत्र्यांनाही संघटनेत पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जी. किशन रेड्डी यांच्याकडे केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालय व ईशान्येकडील राज्यांच्या विकासाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची रवानगी तेलंगणात होणार असल्याने रेड्डींकडून मंत्रीपद काढून घेतले जाऊ शकते. अन्य मंत्र्यांवरही टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते.
भाजपच्या मुख्यालयात मंगळवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व संघटना महासचिव बी. एल. संतोष यांनी केंद्रीय मंत्री किरेन रीरिजू, अर्जुनसिंह मेघवाल, गजेंद्रसिंह शेखावत, एस. पी. सिंह बघेल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडूनही नड्डा व संतोष यांनी माहिती जाणून घेतली. मुख्यालयातील केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटींमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चाना वेग आला आहे. २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने केंद्रीय मंत्र्यांकडून विविध मुद्दय़ांसंदर्भात पक्षाची भूमिका निश्चित करण्यासंदर्भात नड्डांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, नड्डांना भेटून गेलेल्या काही केंद्रीय मंत्र्यांकडे संघटनात्मक जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटक पक्षांना समावून घेणार?
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अनेक पक्ष सहभागी होण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. कर्नाटकमध्ये जनता दल (ध), पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, बिहारमध्ये जीतन मांझी यांचा हिंदूस्थान आवाम मोर्चा, उत्तर प्रदेशातील ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आदी पक्षांच्या भाजप संपर्कात असल्याचे सांगितले जाते. हे संभाव्य घटक पक्ष तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आदींनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
‘तेलंगणात भाजपच्या विजयासाठी प्रयत्न’
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटनमंत्री आणि तेलंगणाचे नवीन भाजप प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी राज्यात भाजपच्या विजयासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तेलंगणात या वर्षांच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर समन्वयाने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. आपण १९८० पासून भाजपसाठी काम करत असून निष्ठावान सैनिक म्हणून काम केले आहे आणि कधीही कोणतेही पद मागितले नाही, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. रेड्डी यांनी अद्याप मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसला तरी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते गैरहजर होते.