नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निष्ठावान आणि ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या ‘वारसा करा’ला पाठिंबा देणाऱ्या कथित विधानामुळे भाजपच्या हाती बुधवारी पुन्हा कोलीत मिळाले. कथित ‘संपत्तीच्या फेरवाटपा’च्या मुद्दयावरून पेटलेला वाद मिटला नसताना पित्रोदा यांच्या अकारण टिप्पणीमुळे काँग्रेस पक्ष कमालीचा अडचणीत आला आहे. पित्रोदांच्या भूमिकेपासून काँग्रेसने तातडीने फारकत घेतली तरी प्रचारसभांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसची कोंडी केली आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये कुठेही ‘संपत्तीच्या फेरवाटपा’चा उल्लेख नसला तरी, मोदींनी आठवडाभरातील प्रचारसभांमध्ये, केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंची संपत्ती काढून घेऊन मुस्लिमांना देईल, असा दावा केला. संपत्तीचे फेरवाटप नव्हे तर अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना करून त्यांना विकासाची संधी दिली जाईल, अशी ग्वाही जाहीरनाम्यात दिल्याचे स्पष्टीकरण राहुल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले. तरीही, सॅम पित्रोदा यांनी मोदींच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना ‘वारसा करा’चे समर्थन करून वादात भर घातली. पित्रोदा यांच्या वक्तव्यापासून स्वत:चा बचाव करताना काँग्रेसच्या नाके नऊ आले. त्यानंतर पित्रोदा यांनी वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देत एक पाऊल मागे घेतले.
हेही वाचा >>> जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
काँग्रेस असहमत सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरून भाजपने बुधवारी हल्लाबोल केल्याने काँग्रेसची त्रेधा उडाली. पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर तसेच, समाजमाध्यम विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद घेऊन पित्रोदांच्या विधानाशी काँग्रेस सहमत नसल्याचे स्पष्ट केले. पित्रोदा अनेक मुद्दय़ांवर मोकळेपणाने मते मांडतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. पण, पित्रोदांच्या मतांशी काँग्रेस सहमत असेल असे नव्हे, असे रमेश म्हणाले.