हृषिकेश देशपांडे
गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागा गेल्या दोन निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. यंदाही त्याची पुनरावृत्ती करण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे गृहराज्य. गेल्या वेळी भाजपला ६२ टक्के तर काँग्रेसला ३२ टक्के मते मिळाली होती. राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्येच सामना होतो. यंदा काँग्रेसने इंडिया आघाडीतून आम आदमी पक्षाला दोन जागा दिल्यात. त्यातही भरूचच्या जागेवरून वाद झाला. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा हा मतदारसंघ. त्यांच्या कुटुंबीयांना ही जागा सोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र आघाडी धर्माचा दाखला देत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर भावनगरची जागा आपल्याला सोडण्यात आली आहे.
आघाडीचा प्रयोग
गुजरातमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दीडशेवर जागा जिंकत विक्रम केला. तर काँग्रेसला आजवरच्या इतिहासात सर्वात कमी जागा मिळाल्या. आम आदमी पक्षाने काही ठिकाणी लक्षणीय मते घेतल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला. यामुळेच लोकसभेला त्यांना दोन जागा सोडाव्या लागल्या. आदिवासीबहुल बाडरेली, दाहोद, वलसाड, छोटा उदयपूर या भागांवर विरोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. मात्र भाजपचे संघटन तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रभाव पाहता विरोधकांना या भागात कितपत यश मिळते याबाबत शंका आहे. संघ परिवारातील विविध संघटनांचे जाळेही येथे मजबूत आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा या शहरी भागांतील जागांवर भाजपपुढे फारसे आव्हान नाही. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी राज्यात सर्व ठिकाणी मतदान होत आहे.
हेही वाचा >>>माहितीच्या अधिकारांतर्गत निवडणूक रोख्यांचा तपशील देण्यास SBI चा नकार, कारण काय?
भाजपपुढील आव्हाने
राज्यात सर्व जागा जिंकण्याचे भाजपचे ध्येय असले तरी, पक्षात उमेदवार निवडीवरून काही ठिकाणी नाराजी उफाळली. एकेका जागेसाठी मोठय़ा प्रमाणात इच्छुक असल्याने कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे हे ज्येष्ठ नेत्यांसाठी आव्हानात्मक आहे. बडोदा तसेच साबरकांठा येथे पक्षाला नव्याने उमेदवार द्यावे लागले. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार दौरा झाल्यावर हे वाद थांबतील, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रुपाला यांच्या विधानाने वाद
केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या एका विधानाने रजपूत समाज संतप्त आहे. रुपाला यांनी माफी मागूनही वाद शमलेला नाही. रुपाला यांची उमेदवारीच रद्द करावी अशी या समाजाची मागणी आहे. तत्कालीन राजे ब्रिटिशांना शरण गेले तसेच त्यांनी त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहारही केला असे रुपाला यांनी म्हटल्याचा ठपका ठेवत गेले पंधरा दिवस रजपूत समाज संघर्षांच्या पवित्र्यात आहे. भाजपने या समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका घेतल्या. मात्र रुपाला यांनी माघार घ्यावी याच मागणीवर ते ठाम आहेत. यातून रजपूत विरुद्ध पाटीदार असाही संघर्ष काही प्रमाणात उभा राहिला.
हेही वाचा >>>“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
लक्षवेधी लढती
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गांधीनगरमधून पुन्हा रिंगणात आहेत. भाजपचा हा बालेकिल्ला मानला जातो. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसने येथून सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्या महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या सहप्रभारी असून, पक्ष संघटनेत त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. पोरबंदर येथून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे िरगणात आहेत. दोन वेळा राज्यसभा सदस्य असलेले मांडविया यंदा जनतेचा कौल अजमावत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने ललितभाई वसावा यांना उमेदवारी दिली आहे. नवसारीमधून प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील हे रिंगणात आहेत. गेल्या वेळी त्यांना विक्रमी मताधिक्य होते. पाटील हे भाजप नेतृत्वाच्या विश्वासातील मानले जातात.
राज्यात यंदा सर्व २६ जागा पाच लाखांच्या मताधिक्याने जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. काँग्रेस- आम आदमी पक्षाच्या आघाडीने मतविभाजन टाळत भाजपला शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे. राज्यात गेल्या दोन निवडणुकांचा निकाल पाहता विरोधकांपुढे आव्हान दिसते.
२०१९ चे बलाबल
एकूण जागा २६ ल्लभाजप २६