|| महेश सरलष्कर
रणधुमाळी
उत्तर प्रदेश, पंजाब , गोवा , उत्तराखंड , मणिपूर
गोरखपूरच्या मध्यवस्तीतून वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजपचा मोठा फलक लागलेला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असले तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा मात्र गायब झालेला आहे. या फलकावर योगींचे नाव नाही, फक्त ‘‘यूपी फिर मांगे भाजप सरकार’’ असे घोषवाक्य लिहिलेले आहे!
मुलींच्या शिक्षणासारख्या मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक करणारे आणि योगींना स्थान न देणारे हे फलक शहरात काही ठिकाणी दिसतात. केंद्रीय नेतृत्वाने योगींकडे वक्र नजरेने पाहिले तरी, इथल्या मतदारांसाठी ते गोरखनाथ मंदिराचे मठाधिपती आहेत, मठाचा मान राखायचा असतो, असे गोरखपूरवासीय मानतात. त्यामुळे योगींसाठी गोरखपूर-शहर हा विधानसभा मतदारसंघ सुरक्षित मानला गेला आहे. गोरखपूर विद्यापीठातील दीपक कुमार या लढवय्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की, मठाधिपती एवढेच योगींचे बलस्थान. स्वकर्तृत्व काही नाही. मठ नसता तर लोकांनी योगींना यापूर्वीच पराभूत केले असते!. योगींनी रोजगार दिला नाही म्हणून बबलू रिक्षावाल्याने नाराजी व्यक्त केली पण, ‘‘गोरखपूरमधून मोदी उभे राहिले तरी योगींचा पराभव करू शकणार नाहीत’’, असे बबलू आत्मविश्वासाने सांगत होता. गोरखपूरपासून सुमारे तासभराच्या अंतरावर पिपराईच गावातील एका तरुणाला योगींचे कर्तृत्व मोठे वाटते. त्याचे म्हणणे होते, ‘‘अख्ख्या उत्तर प्रदेशात योगींनी गुंडांचे राज्य नामशेष केले आहे. माझे मत भाजपलाच’’.. दिवसभरात गोरखपूरला येणाऱ्या विमानांची संख्या कमी असल्याने विमानतळाबाहेर टॅक्सी-रिक्षावाल्यांची भाडे मिळवण्यासाठी चढाओढ असते. भाडे ठरल्यावर यादव समाजातील टॅक्सीवाला म्हणाला, ‘‘समाजवादी पक्षाला सत्ता मिळणार. गोरखपूरमध्ये बाबांचा (योगी) मान राखला जाईल’’.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात समाजवादी पक्षाने भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि उत्तर प्रदेशातील बलाढय़ ब्राह्मण नेता दिवंगत उपेंद्र शुक्ला यांची पत्नी शुभावती यांना उमेदवारी दिली आहे. शुक्लांशी योगींचे वैर इतके की, उपेंद्र शुक्ला यांच्या मृत्यूनंतर योगी कुटुंबियांच्या सांत्वनालाही गेले नाहीत. २०१८च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत योगींनी स्वपक्षीय उमेदवार उपेंद्र शुक्ला यांना विजयी होऊ दिले नाही, असा आरोप केला जातो. या दोन्ही घटना शुक्ला कुटुंबीयांच्या मनात खोल रुतलेल्या आहेत. योगींना धडा शिकवायचा, या एकमेव उद्देशाने शुक्ला कुटुंब विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर समाजवादी पक्षाच्या कळपात डेरेदाखल झाले. गोरखपूर-शहर विधानसभा मतदारसंघातून शुक्ला कुटुंबीय भावनिक लढाई लढत आहेत. ‘‘योगी स्वत:ला मर्यादा पुरुषोत्तम राम मानू लागले आहेत. हे मुख्यमंत्री ‘क्षत्रिय’ असल्याचा अभिमान बाळगतात. केवढा अहंकार बघा.. गोरखपूर ही चमत्कार घडवणारी भूमी आहे, १९७१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंह हे गोरखपूरमधून पराभूत झाले होते. त्याची पुनरावृत्ती होईल’’, असा दावा शुभावती शुक्ला यांचे पुत्र अरिवद शुक्ला यांनी केला. इथे ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद हेही योगींविरोधात लढत असून त्यांनीही योगींच्या पराभव अटळ असल्याचा दावा केला आहे.
गोरखपूरमध्ये ब्राह्मण आणि कायस्थ या सवर्णीयांची लोकसंख्या सुमारे दीड लाख असून त्यात ७० हजार ब्राह्मण आहेत. वैश्य समाजाची लोकसंख्याही २५-३० हजार आहे. या मतदारांच्या भरवशांवर योगींचा पराभव करता येऊ शकतो, असे अरिवद शुक्ला यांचे म्हणणे आहे. इथे काँग्रेसनेही ३७ वर्षीय चेतना पांडे या ब्राह्मण महिलेला योगींविरोधात उमेदवारी दिली आहे. गोरखपूरमध्ये योगींविरोधात दोन महिला उमेदवार संघर्ष करत असून १९७१ च्या विधानसभा निवडणुकीची खरोखरच पुनरावृत्ती झाली तर योगी फलकावरून नव्हे तर, सत्तेच्या खुर्चीवरून गायब होऊ शकतील.