दिल्लीच्या जहांगीरपुरी भागामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. यासंदर्भात तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केल्यानंतर त्यावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींमध्ये मोहम्मद अली जिनांचा डीएनए असल्याचं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले ओवैसी?

जहांगीरपुरी परिसरात झालेल्या प्रकारानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. “दिल्ली महानगर पालिकेनं केलेल्या कारवाईमुळे आणीबाणीच्या काळात दिल्लीच्या तुर्कमन गेटजवळ करण्यात आलेल्या कारवाईची आठवण झाली. इथल्या गरीब मुस्लिमांनी जिवंत राहाण्याची हिंमत केली, म्हणून त्यांना शिक्षा केली जात आहे”, असं ओवैसी म्हणाले होते.

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी अन्सारची ‘पुष्पा’ स्टाईल चर्चेत

“जर तिथलं बांधकाम अवैध होतं तर मग गेल्या ७ वर्षांपासून भाजपा सरकार झोपलं होतं का? तुम्ही एका समाजाला लक्ष्य करून त्यांची मालमत्ता उद्ध्वस्त केली आहे. गुन्हेगार कोण हे ठरवणारे तुम्ही कोण? ते न्यायालय ठरवेल. तुम्ही क्रूरतेचं प्रदर्शन करत आहात”, असं देखील ओवैसी म्हणाले आहेत.

“सगळं काही हिंदू विरुद्ध मुस्लीम असंच बघतात!”

दरम्यान, यावर टीका करताना गिरीराज सिंह यांनी ओवैसींमध्ये जिनांचा डीएनए असल्याचं म्हटलं आहे. “ओवैसींसारखे लोक सर्वकाही हिंदू विरुद्ध मुस्लीम याच दृष्टीने बघतात. ते असं करतात कारण त्यांच्यामध्ये जिनांचा डीएनए आह आणि ते फक्त शरिया कायदाच पाळतात. या देशाचा कायदा नाही”, असं गिरीराज सिंह म्हणाले आहेत.

Story img Loader