राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून संयुक्त जनता दल बाहेर पडल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या बिहार ‘बंद’ला मंगळवारी समिश्र प्रतिसाद मिळाला. संयुक्त जनता दल आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. बंदमुळे बिहारमधील रेल्वेसेवेवर काही ठिकाणी परिणाम झाला. 
पाटणा आणि अन्य शहरांमधील दुकाने बंद ठेवण्यात आली असली, तरी बॅंका आणि इतर कार्यालयातील कामकाज सुरळीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये अजून उन्हाळ्याची सुटी सुरू असल्याने शाळा बंदच आहेत. त्यामुळे भाजपने पुकारलेल्या बंदचा शाळांवर कोणताही परिणाम झालेला नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर पाटण्यातील रस्त्यांवर वर्दळ कमी असून, काही रिक्षाचालक नेहमीप्रमाणे रस्त्यावर व्यवसाय करताना दिसताहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे जन्मगाव असलेल्या नालंदा जिल्ह्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader