उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या जिल्हा पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाने उन्नाव जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीसाठी अरूण सिंह यांना उमेदवारी दिली होती. अरूण सिंह उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंग सेंगरचा निकटवर्तीय व राज्यमंत्री रणवेंद्र प्रताप सिंह उर्फ धुन्नी सिंह यांचे जावाई आहे. त्यामुळेच त्यांची उमेदवारी हा वादाचा मुद्दा बनला आणि बलात्कार प्रकरणातील पीडितेने देखील त्यांच्या उमेदवारीस विरोध दर्शवला होता. परिणामी अवघ्या काही तासांमध्येच भाजपाने युटर्न घेत अरूण सिंह यांची उमेदवारी रद्द केली.

आता अरूण सिंह यांच्या जागी पंचातय सदस्य शकुन सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून यासंदर्भात एक परिपत्रक देखील काढण्यात आलं आहे. बलात्कार प्रकरणातील पीडितेने अरूण सिंह यांच्यावर देखील आरोप केले होते. तर, पीडितेच्या कुटुंबीयांचा जेव्हा अपघात झाला होता, तेव्हा अरूण सिंह यांना देखील आरोपी बनवण्यात आलं होतं. आता पीडितेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून भाजपाने आपला उमेदवार बदलावा अशी मागणी केली होती. पीडितेच्या मागणीनंतर अवघ्या काही तासातच अरूण सिंह यांचं तिकीट कापलं गेलं. यावर अद्यापर्यंत अरूण सिंह यांच्याकडू कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. इंडिया टुडेने या संदर्भात वृत्त दिलेलं आहे.

आणखी वाचा- …तर आम्ही पाच वर्षात उत्तर प्रदेशला पाच मुख्यमंत्री, २० उपमुख्यमंत्री देऊ; नेत्यानं दिला शब्द

या अगोदर भाजपाने कुलदीप सिंग सेंगर यांची पत्नी संगीता सेंगर यांना जिल्हा पंचायत सदस्य पदासाठी उमेदवारी दिली होती. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने त्यांची देखील उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्या अगोदर संगीता सेंगर उन्नाव जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष होत्या.