भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत ३०० जागापेक्षा अधिक जागा जिंकू शकणार नाही, असा दावा काँग्रेसचे नेते, खासदार शशी थरूर यांनी केला होता. यानंतर भाजपाचे खासदार, अभिनेते रवी किशन यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “पाच टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला ३०० जागा मिळणार नाहीत, असे दिसत आहे. बेरोजगारी, महागाई यामुळे सामान्य जनता सरकारवर नाराज आहे. उत्तर भारतातही काँग्रेसला यश मिळेल”, असे शशी थरूर म्हणाले होते. यावर पलटवार करताना रवी किशन यांनी शशी थरूर यांना ‘अंग्रेजी आदमी’ म्हणत त्यांच्यावर टीका केली.
रवी किशन म्हणाले की, आपण मनाली, शिमला याठिकाणी सुट्ट्या घालवण्यासाठी जातो. पण शशी थरूर आणि त्यांच्यासारखे लोक भारतात निवडणुका असताना सुट्ट्या घालविण्यासाठी येतात. त्यांना देशाबद्दल किंवा त्यांच्या गावाबद्दल काहीही माहीत नाही. त्यामुळेच मी म्हणेण की, ते इंग्रजी व्यक्ती आहेत.
रवी किशन हे गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत. पूर्व उत्तरप्रदेशमधील या मतदारसंघात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विधानसभा मतदारसंघ येतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भोजपरी आणि बॉलिवूडचे अभिनेता रवी किशन यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार राम भुवल निशाद यांचा पराभव केला होता.
मंगळवारी रवी किशन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ४ जून रोजी निकाल लागल्यानंतर विरोधकांमधील अर्धा डझन पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येईल आणि त्यांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल. विरोधकांच्या आघाडीतील २६ पक्षांचा मोठा पराभव झालेला आपल्याला दिसेल. यामध्ये सहा पक्ष तर पूर्णपणे नष्ट होतील.
विरोधकांना शरीयतच्या नियमांवर हा देश चालवायचा आहे. पण हे कधीही होऊ शकणार नाही. हा देश केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसारच चालणार, असेही रवी किशन यांनी सांगितले. रवी किशन पुढे म्हणाले की, भाजपाची सत्ता आली तरी संविधानाला कोणताही धक्का लागणार नाही. मात्र काँग्रेसचे सरकार आले तर ते मात्र निश्चितच संविधान बदलतील.
विशेष म्हणजे रवी किशन यांनी भाजपामध्ये येण्यापूर्वी २०१४ च्या लोकसभेत काँग्रेसच्या तिकीटावर जौनपूर लोकसभेतून निवडणूक लढवली होती.