Shagun Parihar Won Election 2024 : जम्मू काश्मीरमधील किश्तवार भाग कधीकाळी दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली होता. येथे सातत्याने दहशतवादी कारवाया सुरू होत्या. याच मतदारसंघातून भाजपाच्या शगुन परिहार यांचा विजय झाला आहे. त्यांच्या वडिलांचा २०१८ साली दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे शगुन यांच्या निवडून येण्याने येथील दहशतवाद मोडीत काढण्यास भाजपाला यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपाने २०१७ मध्ये कलम ३७० रद्द केले. त्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक फार प्रतिष्ठेची होती. निवडणूक जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. गेल्या ४० वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये गेलेले ते पहिले पंतप्रधान होते. यावेळी त्यांनी किश्तवार विधानसभा मतदारसंघाच्या उमदेवार शगुन परिहार यांचाही प्रचार त्यांनी केला होता. “शगुन ही फक्त उमेदवार नसून भाजपा दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ती एक जिवंत उदाहरण आहे”, असं मोदी म्हणाले होते.

हेही वाचा >> Haryana Assembly Election Result 2024 : “…तर मी माझं नाव बदलेन”, खुलेआम दिलेलं आव्हान काँग्रेस प्रवक्त्याच्या अंगाशी येणार? हरियाणातील निकाल येताच सोशल मीडियावर ट्रोल!

वडील आणि काकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू

किश्तवार विधानसभा मतदारसंघ हा मुस्लीम बहुल असून हिंदू समाजही येथे थोड्याप्रमाणात आहे. या दोन्ही समाजांना आकर्षित करण्याकरता भाजपाने शगुन परिहार यांना येथून तिकिट दिली होती. या मतदारसंघासाठी शगून परिहार यांची निवड करण्यामागे येथील मुस्लीम बहुल आणि अल्पसंख्याक असलेला हिंदू समाज आहे. हे क्षेत्र पूर्वी दहशतवादाच्या प्रभावाखाली होता. शगुन परिहार यांचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार यांची नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली. शगुन यांचे वडील भाजपाचे नेते होते.

शगून या २९ वर्षीय असून त्यांच्या वडिलांचा मृत्यू पंचायत निवडणुकीच्या आधी झाला होता. ही जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे होती. परंतु, तरीही भाजपाने ही जागा आता खेचून आणली आहे. फक्त ५०० मतांच्या फरकाने शगून यांनी स्पर्धक उमेदवाराला पराभूत केलं. जम्मूच्या जवळपास २९ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे.

विजयानंतर शगून काय म्हणाल्या?

वडिलांना गमावल्यानंतर त्यांनी मोठ्या हिंमतीने कुटंबाला सावरलं. त्यानंतर त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आणि विधानसभा निवडणूक जिंकल्या देखील. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील या विजयानंतर शगुन परिहार यांनी पीटीआयशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “किश्तवारमधील जनतेची मी आभारी आहे. ज्यांनी माझ्यावर व माझ्या पक्षावर विश्वास दाखवला त्या मतदारांपुढे मी नतमस्तक होते. त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी खरंच त्यांची ऋणी आहे. या पाठिंब्याबद्दल मी विनम्रपणे त्यांचे आभार मानते. मी माझ्या प्रदेशाची सुरक्षा आणि सुरक्षितेसाठी काम करेन”.