देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज (१० एप्रिल) लोकसभा उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत चंदीगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील ९ मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिलेला आहे. हा नारा पार करण्यासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. या अनुषंगानेच आज भाजपाच्या उमेदवारांची दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे.
कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?
चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एस.एस.अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली. तर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबी-विनोद सोनकर, फुलपूर-प्रवीण पटेल, इलाहाबाद-नीरज त्रिपाठी, बलिया-नीरज शेखर, मछलीशहर-बी.पी.सरोज, गाजीपूर-पारस नाथ राय यांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा : भाजपा उमेदवाराने प्रचारादरम्यान महिलेचं घेतलं चुंबन; फोटो व्हायरल
महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा होणं अद्याप बाकी आहे. याचे कारण महायुतीतील पक्षांमध्ये काही लोकसभेच्या मतदारसंघावरुन रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे हे मतदारसंघ भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, यापैकी कोणाकडे जातात, हे येत्या काही काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात पार पडणार असून १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात मतदान होणार आहे.