काँग्रेस पक्ष आणि भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. स्मृती इराणी या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री असून अमेठीच्या खासदार आहेत. दिल्लीत महिला कुस्तीपटूंचं ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन चालू असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं बुधवारी स्मृती इराणी यांच्या फोटोसह ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटला आता स्मृती इराणींनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
दिल्लीत गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या पदकविजेत्या महिला कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही कुस्तीपटूंना पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी यावर भूमिका मांडलेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं खोचक ट्वीट केलं होतं.
काँग्रेसने म्हटलं स्मृती इराणी ‘Missing’, केंद्रीय मंत्री राहुल गांधींना लक्ष्य करत म्हणाल्या…
काँग्रेसच्या ट्वीटमध्ये काय?
काँग्रेसनं बुधवारी स्मृती इराणींना उद्देशून दोन ट्वीट केले. यातल्या एका ट्वीटमध्ये स्मृती इराणींचा फोटो शेअर करत ‘Missing’ अर्थात ‘हरवले आहेत’ असं ट्वीट काँग्रेसनं केलं आहे.
दुसऱ्या ट्वीटमध्ये “महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर स्मृती इराणी लपवाछपवी करतात”, असं म्हटलं असून त्यांच्याच बाजूला मीनाक्षी लेखी यांचा फोटो आहे. यावर “महिला कुस्तीपटूंच्या मुद्दायवर या पळ काढतात”, असं लिहिलं आहे. यावर आता स्मृती इराणींकडून खोचक प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तसेच, आपल्या ट्वीटमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींनाही लक्ष्य केलं आहे.
काँग्रेसच्या ट्वीटला दिलेल्या उत्तरात स्मृती इराणी म्हणतात, “हे दिव्य राजकीय प्राण्या…मी सध्या अमेठी लोकसभा मतदारसंघातल्या सलोन विधानसभा मतदारसंघातील सिरसिरा गावाहून धुरनपूरच्या दिशेने निघाले आहे. जर तू माजी खासदारांना शोधत असशील, तर कृपया अमेरिकेत संपर्क कर”!
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.