ज्यांच्या मनात चोरी असते तेच चौकीदाराला चोर ठरवण्याचा प्रयत्न करतात, चार चोर एकत्र येऊन चौकीदाराला चोर ठरवू शकत नाही, चौकीदाराची भीती वाटू लागल्यानेच असे आरोप केले गेले, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. सूर्यावर कितीही चिखलफेक केली तरी त्याचे तेज कमी होत नाही, असेही त्यांनी सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, हा सत्याचा विजय असून या निर्णयामुळे काँग्रेसला चपराक असल्याची टीका त्यांनी केली.
खोट्या दाव्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्याचा याहून मोठा प्रयत्न स्वातंत्र्यांनंतर कधीच झाला नाही आणि दुर्दैव म्हणजे हा प्रयत्न देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला, अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. राफेल करारासंदर्भात देशातील जनतेला आणि सैन्याची दिशाभूल केल्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. २००७ ते २०१४ या काळात राफेल करार पूर्णत्वास का नाही गेला?, हे राहुल गांधींनी आधी स्पष्ट करावे, काँग्रेसच्या कार्यकाळात करारात कमिशनखोरांची चांदी होती, त्यामुळे राहुल गांधी यांनी आधी स्वत:कडे पाहावे, असा चिमटा त्यांनी काढला.
राहुल गांधींनी सर्व प्रथम या करारासंदर्भात त्यांना कोणी माहिती दिली हे सांगावं, त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य होते तर ते सुप्रीम कोर्टात का गेले नाही, असा सवालही अमित शाहांनी विचारला आहे. आज काँग्रेस पक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करत आहे, राफेल करारासंदर्भात संसदेत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत, काँग्रेसने माझे चर्चेचे आव्हान स्वीकारावे, असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींच्या प्रामाणिकतेबद्दल जनतेच्या मनात शंका नाही, असेही त्यांनी नमूद केले.