नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आता काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
अशात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. एनआयए वृतसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत नड्डा यांनी बोचरा सवाल विचारला आहे. तुम्ही कधी गुन्हेगाराला ‘मी गुन्हेगार आहे’ असं म्हणताना पाहिलं आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे ते (सोनिया गांधी-राहुल गांधी) आपल्यावर झालेले आरोप नाकारणारच, असंही ते म्हणाले.
“आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ते रद्द व्हावं, यासाठी आपण न्यायालयात जातो, परंतु त्यांनी जामीन मागितला. याचा अर्थ ते दोषी आहेत” असं विधान जेपी नड्डा यांनी केलं आहे. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही… छाती ठोकून लढणार.”
इतर नेत्यांवरही आरोप
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.