उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपा या दोन्ही पक्षाचा आपापसात छत्तीसचा आकडा. पण प्रेम म्हटलं की, त्याला वय, पक्ष, जात, धर्म, पंथ, प्रांत याचं काही बंधन नसतं. प्रेमाचा असाच अजब किस्सा उत्तर प्रदेशच्या हरदोई येथे घडला आहे. भाजपाच्या ४७ वर्षीय वृद्धाने एका २६ वर्षीय मुलीला फसवून पळून नेल्याचा आरोप लावला गेला आहे. हा ४७ वर्षीय नेता भाजपाचा नगर महामंत्री असून समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलीसोबत त्याने लग्न केले आहे. यावरुन हरदोईमध्ये चांगलाच गजहब झाला आहे.
या प्रकारानंतर आता समाजवादी पक्षाच्या नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील या तक्रारीनंतर भाजपा नेत्याच्या विरोधात तक्रार गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. भाजपा नेत्याच्या या प्रतापामुळे जिल्ह्यात भाजपाची मात्र चि-थू होतेय. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष्यांनी सदर आरोपीस तात्काळ पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. तसेच आता पोलिस जी काही भूमिका घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल असे जाहीर करुन टाकले.
हे वाचा >> “खान, शेख नाव नसल्यामुळं आमच्या नवनीत अक्काचं भगव्या कपड्यातील ते गाणं..”, सुषमा अंधारेंची खोचक टीका
हरदोई शहरात हे प्रकरण घडले आहे. भाजपाचे नगर महामंत्री आशिष शुक्ला यांच्यावर सपा नेत्याच्या मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुलीच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले की, आशिष शुक्ला याने १३ जानेवारी रोजी त्याच्या मुलीला फसवून, आमिष दाखवून तिच्याशी लग्न केले आणि नंतर तिला घेऊन फरार झाला. सपा नेत्याने असाही दावा केला की, आशिष शुक्ला हा ४७ वर्षांचा असून त्याला दोन मुलं आहेत. तरिही त्याने माझ्या २६ वर्षांच्या मुलीला खोट्या भुलथापा देऊन आपल्या जाळ्यात ओढले आणि पळवले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आशिष शुक्ला आणि मुलीचा शोध घेतला जात आहे. त्यातच भाजपाचे जिल्हाध्यक्ष सौरभ मिश्रा यांनी आरोपी आशिष शुक्लाला पक्षातून निलंबित केले आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य करु, असे आश्वासन दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला सपाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र वर्मा यांनी सांगितले की, आरोपी शुक्ला भाजपात होता. तरिही सपा कार्यकर्त्यांच्या घरी त्याचे येणे-जाणे असायचे. आम्ही त्याला चांगला समजत होतो. पण मुलंबाळं असूनही तो इतके गलिच्छ काम करेल, असे वाटले नव्हते.