राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते नसीर हुसेन यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी “पाकिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. परंतु, काँग्रेसने हे दावे फेटाळून लावले असून त्यांचे कार्यकर्ते हुसेन यांच्यासाठी फक्त घोषणा देत होते, असं त्यांनी स्पष्ट केलं. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मंगळवारी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. तर संध्याकाळी मतमोजणीही झाली. यामध्ये काँग्रेसने कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा जिंकल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुसैन यांच्या विजयाचा आनंद साजरा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि आरोप केला की या व्हिडिओमधून “पाकिस्तान झिंदाबाद” असा आवाज केला जात आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे राजकीय सचिव नसीर हुसेन यांनी कर्नाटकमधून राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. काँग्रेसचे पाकिस्तानबद्दलचे वेड धोकादायक आहे. ते भारताला बाल्किस्तानकडे घेऊन जात आहे. ते आम्हाला परवडणारे नाही”, असे मालवीय म्हणाले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि कर्नाटकचे नेते सीटी रवी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नसीर हुसेन यांचं स्पष्टीकरण काय?
भाजपचा दावा फेटाळून लावत काँग्रेस नेते नसीर हुसेन म्हणाले की, त्यांनी ‘नसीर हुसेन झिंदाबाद’, ‘काँग्रेस पार्टी झिंदाबाद,’ ‘नसीर खान झिंदाबाद’ आणि ‘नसीर साब जिंदाबाद’ अशा घोषणाच ऐकल्या. “माध्यमांमध्ये जे काही दाखवले गेले ते मी ऐकले नाही. जर मी ते ऐकले असते, तर मी आक्षेप घेतला असता, विधानाचा निषेध केला असता आणि त्यांच्यावर आवश्यक कारवाईची मागणी केली असती”, ते म्हणाले.
तसंच, काँग्रेसने घटनास्थळावरील मूळ व्हीडिओही सादर केला. ज्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकू येत नाहीत. त्यामुळे आता कोणता व्हीडिओ खरा आणि कोणता खोटा हे पोलीस तपासातूनच सिद्ध होईल.