दादरी हत्याकांडात भाजपच्या तीन नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी केला, त्यावरून भाजपने मुलायमसिंह यांच्यावर पलटवार केला आहे. उत्तर प्रदेश सरकारचे अपयश झाकण्यासाठी मुलायमसिंहांचा प्रयत्न सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार असून राज्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी मुलायमसिंह यांनी हे विधान केले आहे. सपाच्या राजवटीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी म्हटले आहे.
दादरी हत्याकांडात भाजपचे किमान तीन नेते सहभागी आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इच्छा व्यक्त केल्यास त्यांना आपण नावे सांगू शकतो, असे वक्तव्य मुलायमसिंह यांनी केले होते, त्यावर भाजपने पलटवार केला आहे.
दादरीबाबत राज्य प्रशासनाने केंद्र सरकारला अहवाल सादर केला त्यामध्ये कारस्थान अथवा गोमांसचा उल्लेख नव्हता. त्यामुळे तो अहवाल चुकीचा आहे की यादव यांचा दावा चुकीचा आहे, असेही शर्मा म्हणाले. इतरांवर टीका करण्यापेक्षा सरकारचा कारभार सुधारण्यावर पक्षाने भर द्यावा, असेही शर्मा म्हणाले.

Story img Loader