पीटीआय, लंडन : ‘‘सत्ताधारी भाजपला कसेही करून सत्ता मिळवायची आहे. या पक्षाच्या आचरणाचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही,’’ अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. फ्रान्सची पॅरिसस्थित अग्रगण्य समाजविज्ञान संस्था ‘सायन्सेस पीओ विद्यापीठा’त विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांनी या वेळी आपली ‘भारत जोडो यात्रा’, भारतातील लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी करण्यात आलेली विरोधी पक्षाची ‘इंडिया’ आघाडी, बदलती जागतिक व्यवस्था आदी प्रमुख मुद्दय़ांवर चर्चा केली. या संवादाची ध्वनिचित्रफीत रविवारी प्रसृत करण्यात आली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या आत्म्याच्या रक्षणासाठी विरोधी आघाडी कटिबद्ध असून, देश सध्याच्या अस्वस्थ-अशांत वातावरणातून सहीसलामत बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त करून राहुल म्हणाले, की मी गीता वाचली आहे. मी उपनिषदेही वाचली आहेत. त्यासह अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचेही मी वाचन केले आहे. त्यातून माझ्या असे निदर्शनास आले, की भाजपचे आचरण हिंदू धर्माप्रमाणे अजिबात नाही. एखाद्या कमजोर व्यक्तीला भीतीच्या सावटाखाली ठेवावे, त्याला इजा पोहोचवावी, त्याचे नुकसान करावे, असे मी एकाही हिंदू धर्मग्रंथांत वाचले नाही अथवा कुणा हिंदू विद्वानाकडून ऐकलेही नाही. हिंदू राष्ट्रवाद हा विचार आणि शब्द चुकीचा आहे. ते हिंदू राष्ट्रवादी नाहीत. त्यांना हिंदू धर्माशी काहीही देणे-घेणे नाही. कुठलेही मोल चुकवून त्यांना सत्ता मिळवायची-टिकवायची आहे. त्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना काही मोजक्या व्यक्तींच्या हातात सत्ता हवी आहे. त्यांच्यात हिंदू धार्मिकता वगैरे काही नाही. 

भारत-इंडिया वाद..

भारत-इंडिया या देशाच्या नावावरून सुरू झालेल्या वादावर राहुल म्हणाले, की, राज्यघटनेत देशाची व्याख्या ‘इंडिया म्हणजेच भारत, संघराज्य’ अशी करण्यात आली आहे. सर्व राज्ये इंडिया किंवा भारत निर्माण करण्यासाठी एकत्र आली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा आवाज व्यवस्थित ऐकला जातो. कोणताही आवाज दाबला जात नाही किंवा धमकी देऊन बंद केला जात नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp conduct has nothing to do with hinduism criticism of rahul gandhi in paris ysh
Show comments