तीन राज्यात स्पष्ट बहुमत तर दिल्लीत सर्वाधिक जागाजिंकणाऱ्या भाजपच्या विजयाचे श्रेय भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्थानिक नेत्यांना दिले. देशात मोदीलाट आल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून राजनाथ सिंह यांनी मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ भाजपला मिळाल्याचे ठोस प्रतिपादन केले. तर जनमताचा आदर असून काँग्रेसमध्ये सुधारणा करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नोंदवली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना सोनिया गांधी यांनी ‘योग्य वेळी आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषीत करू’, असे उत्तर दिले. राजनाथ म्हणाले की, मतदान केंद्र स्तरावर काम करणाऱ्या सामान्य कार्यकत्याच्या परिश्रमाचे चीज झाले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये चांगले काम केल्यानेच शिवराज सिंह चौहान व रमणसिंह यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. देशभर सत्ताविरोधी लाट नसून काँग्रेसविरोधी लाट आली आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये तर सत्ताधाऱ्यांच्या समर्थनाची लाट आली आहे. चार राज्यातील मतदारांनी काँग्रेसला नाकारले. यात मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ भाजपला झाला.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, वाढती महागाई हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. काँग्रेसविरोधात नाराजी असल्यानेच दारूण पराभव झाला. निवडणूक प्रचाराकडे दुर्लक्ष झाले. झालेल्या चूकांचा शोध घेवून त्यात सुधारणा करू.  राहुल गांधी म्हणाले की, पारंपारिक पद्धतीने प्रचार करणाऱ्या भाजप व काँग्रेसला आम आदमी पक्षापासून धडा घ्यावा लागेल. लोकांनी आम्हाला (काँग्रेसला) स्पष्ट संदेश दिला आहे. त्याचा योग्य अर्थ आम्ही काढला आहे. आमची कामगिरी आम्ही सुधारू. काँग्रेसमध्ये मोठे बदल झालेले दिसतील, असे सूचक वक्तव्य राहुल गांधी यांनी यावेळी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा