मागील काही दिवसांपासून उदयपूर हत्याकांड प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली आहे. प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या कारणातून दोन तरुणांनी कन्हैय्या लाल नावाच्या एका टेलरची निर्घृण हत्या केली होती. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी हत्येचा सर्व व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती.
ही घटना घडल्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर या गुन्ह्यांशी संबंधित अन्य दोन संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहेत. दरम्यान, अटक केलेल्या आरोपीचं भाजपा कनेक्शन समोर आलं आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने देखील संबंधित फोटो ट्वीटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये कन्हैय्या लाल यांच्या हत्येत सहभागी असणारा एक आरोपी भाजपाच्या स्थानिक नेत्यासोबत फोटोत दिसत आहे. हा फोटो जुना असून फोटोतील व्यक्ती आरोपीशी मिळती जुळती आहे. हा फोटो शेअर करत काँग्रेसने “योगायोग की प्रयोग?” असा बोचरा सवाल भाजपाला विचारला आहे. लोकसत्ताने या फोटोची पुष्टी केलेली नाही.
हेही वाचा- उदयपूर हत्या प्रकरण: संतप्त जमावाकडून कोर्टाबाहेर आरोपींवर हल्ला, VIDEO आला समोर
नेमकं प्रकरण काय?
भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असताना, मृत कन्हैय्या लाल यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याचाच राग मनात धरून आरोपी मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मद यांनी २८ जून रोजी कन्हैय्या लाल यांची निर्घृण हत्या केली. क्रूरतेचा कळस म्हणजे आरोपींनी हत्या करतानाचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याच व्हिडीओतून आरोपींनी हत्येची कबुली देखील दिली होती.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच दिवशी दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली. त्यानंतर आसिफ हुसेन आणि मोहसीन खान यांना देखील पोलिसांनी अटक केली. शनिवारी आरोपींना तोंड झाकून जयपूर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) केला जात आहे.