कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखाली हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम म्हणजे लोकसभा निवडणुकांआधी राज्याला बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान होते असा आरोप राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने केला आहे. तृणमूलने शनिवारी समाजमाध्यमावर एक ध्वनिचित्रफित प्रसिद्ध करून हा आरोप केला आहे. मात्र, ‘पीटीआय’ने या ध्वनिचित्रफितीच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही.
या ध्वनिचित्रफितीत एक व्यक्ती आपण संदेशखालीचे भाजप मंडल अधिकारी असल्याचे सांगत आहे. ‘‘या संपूर्ण कारस्थानामागे पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी’’ असल्याचे तो इसम सांगत आहे. या व्यक्तीच्या सांगण्यानुसार, अधिकारी यांनी त्याला आणि त्या भागातील भाजपच्या अन्य नेत्यांना शाहजहान शेखसह तृणमूल काँग्रेसच्या तीन नेत्यांविरोधात बलात्काराचा आरोप करण्यासाठी तीन-चार स्थानिक महिलांना भडकावण्यासाठी सांगितले होते. पुढे हा कथित स्थानिक भाजप नेता असेही म्हणताना ऐकू येते की, अधिकारी यांनीच संदेशखालीमधील घरामध्ये बंदुका ठेवल्या होत्या, त्या नंतर केंद्रीय यंत्रणांनी ताब्यात घेतल्याचे दाखवण्यात आले.
हेही वाचा >>> निज्जर हत्याप्रकरणी तिघे अटकेत; करण ब्रारसह तिघांवर हत्येसह कट रचल्याचा कॅनडा पोलिसांचा आरोप
तृणमूलने ‘एक्स’वर ‘संदेशखालीवर मोठा भांडाफोड’ या मथळयाखाली एक पोस्ट सामायिक केली आहे. अधिकारींनी बंगाल आणि संदेशखालीला बदनाम करण्यासाठी स्थानिक लोकांना पैसे देऊन सामूहिक बलात्काराचे खोटे कथन तयार केले असा आरोप तृणमूलने या पोस्टमध्ये केला आहे. ‘‘बंगालच्या बदनामीसाठी भाजपने कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही हे या ध्वनिचित्रफितीतून स्पष्ट होते. अन्य कोणी नाही तर सुवेंदू अधिकारी यांनी सामूहिक बलात्कार ते शस्त्रजप्ती, असा प्रत्येक दावा दावा केला आणि त्याचा बनाव रचला’’, असा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया अद्याप कळू शकली नाही. तर, भाजपमध्ये किती खोलवर कीड आहे हे धक्कादायक संदेशखाली स्टिंगमधून दिसत आहे अशी टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
बंगालचे प्रगतीशील विचार आणि संस्कृतीचा त्यांना वाटणाऱ्या द्वेषातून, बांगलाविरोधींनी आपल्या राज्याची शक्य त्या सर्व पातळयांवर बदनामी करण्याचे कारस्थान रचले. भारताच्या इतिहासात कधीही दिल्लीतील सत्ताधारी पक्षाने एक संपूर्ण राज्य आणि तेथील जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नव्हता. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल