पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मथुरेच्या खासदार आणि उमेदवार हेमा मालिनी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप भाजपने काँग्रेस नेत्यांवर केला आहे. काँग्रेस नेते चरणदास महंत यांनी मोदी यांच्याबाबत तर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनींबाबत कथितरित्या टिप्पणी केली आहे. यावर सार्वत्रिक हल्ला चढविताना काँग्रेस नेत्यांचे संतुलन ढळल्याचा आरोप भाजपने केला.
भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी महंत आणि सुरजेवाला यांच्या भाषणांच्या ध्वनिचित्रफिती गुरुवारी प्रसृत केल्या. महंत यांच्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘‘आपल्याला कुणीतरी असा हवा आहे, की जो लाठी घेईल आणि नरेंद्र मोदी यांचे डोके फोडेल’’ असे ते म्हणताना दिसत आहेत. तर सुजरेवाला हे एका सभेमध्ये केलेल्या भाषणात अभिनेत्री आणि नेत्या असलेल्या हेमा मालिनींबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टीका करताना दिसत आहेत. हा केवळ मालिनी यांचाच अपमान नसून सर्व स्त्रियांचा अपमान आहे, अशी शब्दांत मालवीय यांनी तोफ डागली. तर महिलांचा सन्मान कसा करायचा, हे काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिकावे, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी दिला. तसेच जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतसा लोकांचा पंतप्रधानांना वाढता पािठबा दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, असा हल्लाबोल त्रिवेदी यांनी केला.
हेही वाचा >>>अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
सुरजेवालांनी आरोप फेटाळले
सुरजेवाला यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून अर्धवट चित्रफीत दाखवून आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा पलटवार केला. भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला असत्य पसरविण्याची सवय लागली आहे, असे ते म्हणाले.
महिला आयोगाची तक्रार
सुरजेवाला यांच्या कथित विधानाची राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. ‘सुरजेवाला यांचे विधान हे महिलाविरोधी आणि महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचविणारे आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले असून सुरजेवाला यांच्यावर तातडीने कारवाई करून तीन दिवसांत कृतीअहवाल सादर करण्यास सांगितले आहे,’ असे महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.