राजकीय पक्षांकडून आपल्या कार्यक्रमांचं, योजनांचं किंवा आश्वासनांचं मोठ्या प्रमाणावर प्रमोशन केलं जातं. यासाठी मोठमोठे पोस्टर्सत शहरांमध्ये लावले जातात. कार्यक्रमस्थळी तर अशा पोस्टर्सचं ठिकठिकाणी दर्शन होतं. भाजपाच्या दिल्लीतील अशाच एका कार्यक्रमातील पोस्टरवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. कारण या पोस्टरमध्ये झोपडपट्टीमधील रहिवासी म्हणून चक्क तमिळ साहित्यिक मुरुगन यांचा फोटो लावण्यात आला आहे. या मुद्द्यावरून वाद निर्माण होताच त्यावर भाजपाकडून सारवासारवीची उत्तरं देण्यात आली असली, तरी खुद्द मुरुगन यांनी मात्र एका साहित्यिकाला साजेशी अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं झालं काय?

राजधानी दिल्लीमध्ये भाजपाकडून झुग्गी सम्मान यात्रा अर्थात झोपडपट्टी सन्मान यात्रा नावाचा एक उपक्रम राबवला जात आहे. आगामी दिल्ली महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रचार मोहीम राबवली जात असून दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर छापण्यात आलेल्या पोस्टर्सची सध्या चर्चा सुरू झाली आहे. कारण या पोस्टर्सवर तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांचा फोटो झोपडपट्टी रहिवासी म्हणून छापण्यात आला आहे.

कोण आहेत पेरुमल मुरुगन?

पेरुमल मुरुगन हे नावाजलेले तामिळ साहित्यिक आहेत. त्यांनी आजपर्यंत १० कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा, तसेच कविता लिहिल्या आहेत. मात्र, त्यांचा फोटो पोस्टर्ससाठी वापरल्यामुळे यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

पोस्टर वादावर मुरुगन म्हणतात…

सोमवारी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यक्रमात देखील मुरुगन यांचा फोटो लावलेलंच पोस्टर झळकल्यानंतर या मुद्द्यावरून तीव्र आक्षेप घेण्यात येत आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता पेरुमल मुरुगन यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली आहे. “मी स्वत: झोपडपट्टीमध्ये राहिलो आहे. त्यामुळे माझा फोटो त्यांच्यासोबत झळकल्यामुळे मला आनंदच झाला आहे”, असं मुरुगन इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान, यासंदर्भात दिल्ली भाजपा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत एका भाजपा नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या पोस्टर्सचे डिझाईन सामान्यपणे खासगी कंपन्यांना बनवण्यासाठी दिले जातात किंवा क्वचित प्रसंगी ते पक्षाच्या आयटी सेलकडून तयार केले जातात. पण या दोन्ही बाबतीत पक्षातील वरीष्ठांकडून मंजुरी मिळाल्यानंतरच ते छापले जातात. मात्र, पेरुमल मुरुगन यांचा फोटो वापरण्यामागे नेमकं काय कारण ठरलं? याविषयी पक्षाकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.