BJP Candidate list 2024 : भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३४ मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. भाजपाने पहिल्या यादीत २८ महिला उमेदवारांची नावंदेखील जाहीर केली आहेत. भाजपाने यावेळी अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी न देऊन त्यांचे पंख छाटले आहेत. तर काही नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. काही मतदारसंघात आयारामांना संधी दिली आहे. दरम्यान, भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीतल्या एका नवाने अनेकाचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते नाव म्हणजे बांसुरी स्वराज. भारताच्या दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना पक्षाने दिल्लीतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.
भाजपाने दिल्लीतल्या लोकसभेच्या सातपैकी पाच जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौकातून, मनोज तिवारींना उत्तर-पूर्व दिल्लीतून, बांसुरी स्वराज यांना मध्य दिल्ली, कमलकित सहरावत यांना पश्चिम दिल्ली आणि रामवीर बिधुडी यांना दक्षिण दिल्लीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. भाजपाने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी बांसुरी स्वराज यांना संधी दिली आहे. तर दक्षिण दिल्लीत रमेश बिधुडी यांचं तिकीट कापलं आहे. चांदणी चौकात माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि पश्चिम दिल्लीत विद्यमानखासदार प्रवेश वर्मा यांचं तिकीट कापलं आहे.
दरम्यान, भाजपाने यंदाच्या निवडणुकीत भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं तिकीटही कापलं आहे. भाजपाने प्रज्ञा ठाकूर यांच्याऐवजी आलोक शर्मा यांना भोपाळमधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना पराभवाची धूळ चारून त्या जायंट किलर ठरल्या होत्या. पंरतु, नरेंद्र मोदी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर नाराज असल्याने त्यांचं तिकीट यावेळी कापण्यात आलं आहे, अशी चर्चा ऐकायला मिळतेय.
पंतप्रधान मोदी प्रज्ञा ठाकूरांवर नाराज?
भाजपाने २०१९ मध्ये संरक्षणविषयक २१ सदस्यीय सल्लागार समिती नेमली होती. या समितीत प्रज्ञा ठाकूर यांचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, ठाकूर यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांची या समितीतून हकालपट्टी करण्यात आली होती. प्रज्ञा ठाकूर यांनी संसद भवनामध्ये नथुराम गोडसे याला राष्ट्रभक्त घोषित केलं होतं. त्यानंतर ठाकूर यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे पक्षश्रेष्ठी ठाकूर यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्रातला नेता यूपीच्या मैदानात
दरम्यान, भाजपाने पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तिसऱ्यांदा लोकसभा लढवणार आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील उमेदवारांच्या यादीतलं एक नाव पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांनादेखील लोकभेची उमेदवारी देण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह उत्तर प्रदेशमधील जौनपूर मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. एके काळचे मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. भाजपात गेल्यानंतर त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापाठोपाठ आता त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.