जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी भेट घेतल्याचे वृत्त भाजपने गुरुवारी दुपारी फेटाळले. पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी भाजपच्या नेत्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट घेतल्याचे वृत्त निराधार असल्याचे ट्विट केले. उमर अब्दुल्ला यांनीही भाजपच्या नेत्यांची भेट घेतल्याचे वृत्त फेटाळले. आपण वैयक्तिक कारणांसाठी दिल्लीमध्ये आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उमर अब्दुल्ला यांनी नवी दिल्लीमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि राम माधव यांची भेट घेतल्याचे वृत्त माध्यमांमधून देण्यात आले होते. मात्र, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ते फेटाळले आहे. दरम्यान, भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापण्याची शक्यताही नसल्याचे दिसते आहे. आपण पीडीपीला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याची जाहीर केले आहे. आता निर्णय त्यांना घ्यायचा असल्याचे उमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत पीडीपी सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. या पक्षाला २८ जागा मिळाल्या आहेत.
दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेबाबत सर्व निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिला असल्याचे अरूण जेटली यांनी स्पष्ट केले.

Story img Loader