वादग्रस्त प्रश्नांबाबत कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही आणि आघाडीची ताकद वाढविण्याची ज्या नेत्यांची क्षमता नाही, त्यांच्या नेतृत्वाबाबत कोणतीही घोषणा केली जाणार नाही, असा शब्द भाजपने दिला होता. मात्र त्याचे पालन त्यांनी न केल्यानेच एनडीएमधून जद(यू) पक्ष बाहेर पडला, असे स्पष्टीकरण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिले आहे.
दरम्यान, नितीशकुमार हे संधीसाधू आणि भाजपशी प्रतारणा करणारे नेते असल्याच्या आरोपांचे नितीशकुमार यांनी जोरदार खंडन केले आहे. आम्ही भाजपशी प्रतारणा केलेली नाही आणि आपण संधीसाधू असल्याचा करण्यात आलेला आरोप निराधार आहे, असे ते म्हणाले.
राम मंदिर, कलम ३७० लागू करण्यात येणार नाही आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी तूर्त रोखून धरली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतरच आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो. इतकेच नव्हे तर ज्या नेत्यांमध्ये आघाडी बळकट करण्याची क्षमता नाही, त्यांच्या नेतृत्वाबाबत कोणतीही घोषणा न करण्याची अट जद(यू)ने घातली होती, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये बाह्य़ शक्तींना दूर ठेवण्याची अटही आम्ही भाजपला घातली होती, असे मुख्यमंत्र्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता स्पष्ट केले. आघाडीतील घटक पक्षांशी सल्लामसलत न करता नेत्याचे नाव जाहीर करू नये, असेही भाजपला सांगण्यात आले होते. भाजपचे नवे नेतृत्व प्रत्येकाला दीर्घकाळ बरोबर घेऊन जाऊ शकणारे नाही, असेही नितीशकुमार म्हणाले.
गुजरातच्या विकासाचे मॉडेल पुढे केले जात असले तरी केवळ एका राज्याच्या विकासाचे मॉडेल संपूर्ण देशाचा विकासासाठी लाभदायक ठरू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. विविध राज्यांसाठी विकासाची विविध मॉडेल्स आहेत, असेही ते म्हणाले.

Story img Loader