— समीर जावळे, जळगाव
देशात भाजपाची सत्ता येऊन मोदी पुन्हा पंतप्रधानपदी बसतील असं वाटत नाही असं मत राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार ईश्वलाल जैन यांनी व्यक्त केलं आहे. देशात २०१४ ला जी मोदी लाट होती तशी काहीही परिस्थिती आता नाही. त्यावेळपेक्षा निश्चितच चांगलं वातावरण सध्या देशात आहे. देशपातळीवर विचार केला तर भाजपाच्या जागा कमी होतील. कारण हिंदी पट्ट्यात त्यांनी सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या मात्र, सध्या त्यांच्याबाबत नाराजी असल्याचं स्पष्ट दिसतं आहे, असे जैन यांनी म्हटलं आहे.
बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात एकत्र आले आहेत ज्याचा फटका निश्चितच भाजपाला बसणार आहे. २०१९ मध्ये या दोघांना मिळून किमान ४० जागा मिळतील असा अंदाज आहे. मग या ४० जागा येणार कुठून? तर त्या भाजपाच्याच कमी होणार आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही ठिकाणी फक्त ३ जागा काँग्रेसच्या आल्या होत्या. मात्र, सध्याची परिस्थिती बदलली आहे. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली आहे त्यामुळे इथेही जागा भाजपाच्या जागा कमी होतील.
लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपा कदाचित मोठा पक्ष ठरू शकेल मात्र त्यांना स्पष्ट बहुमत मिळेल असं मुळीच वाटत नाही असंही ईश्वरलाल जैन यांनी म्हटलं आहे. इतर पक्षांशी हातमिळवणी करूनही भाजपाला बहुमत सिद्ध करता येईल, असं वाटत नाही आणि नव्याने त्यांच्याशी कोणी हातमिळवणी करेल असंही वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
जळगावातल्या परिस्थितीबाबत विचारलं असता जैन म्हणतात, जळगावातून गुलाबराव देवकर निवडून यावेत यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. भाजपाच्या अंतर्गत बंडाळीचा, नाराजीचा आम्हाला फायदा होईल असं वाटत आहे. नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन निर्णय फक्त सराफ व्यवसायच नाही तर अनेक व्यवसाय बुडीत खात्यात घालणारे निर्णय ठरले आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नाराजी आहे.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक व्यवसायांचे नुकसान झाले, अनेक तरूण बेरोजगार झाले. नोटाबंदीच्या पूर्वी जे वातावरण होतं ज्या प्रकारे स्थिरता होती ती अजूनही आलेली नाही. सराफ व्यवसायावर ३ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे, तो जास्त आहे, सोनं घेणारे ग्राहक कुठेतरी नाराजीने ही खरेदी करतो जीएसटी शिवाय कुणी देत असेल तर ते घेण्याचा प्रयत्न ग्राहक करतात. त्यामुळे जीएसटीचा निर्णय हा कुठेतरी काळ्या बाजाराला खतपाणी घालणारा ठरताना दिसतो आहे, असे मत जैन यांनी व्यक्त केले आहे.