नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य नेतृत्वावरून जनता दल संयुक्तशी (जदयु) उद्भवलेल्या संघर्षांवर भारतीय जनता पक्षाने सामोपचाराने तोडगा काढण्याचे ठरविले आहे. मोदींची मुक्तकंठाने प्रशंसा करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह रालोआतील सर्व घटक पक्षांचे ऐक्य शाबूत राखण्याला प्राधान्य देत तारेवरची कसरत करीत आहेत.
‘भाजप आणि जदयु २०१४ साली होणारी लोकसभा निवडणूक एकत्र लढतील. परिस्थिती एवढी विकोपाला गेलेली नाही. आम्ही आमचे मतभेद चर्चेद्वारे सोडवू,’ असे राजनाथ सिंह यांनी वुमेन्स प्रेस कॉर्पमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. मोदींच्या संभाव्य उमेदवारीवर आक्षेप घेणारे जदयुचे सर्वेसर्वा व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अधिक न दुखावले जाणार नाहीत, याची काळजी घेत भाजपने आपली अस्मिता कायम राखण्याचा प्रयत्न चालविला आहे. आम्ही मित्रपक्षांना गमावू इच्छित नाही, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी पक्षाचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी मोदींच्या नावाला आक्षेप घेणाऱ्या जदयुला अप्रत्यक्ष टोला लगावला. पंतप्रधानपदाचा उमेदवार भाजपचा असेल, पण भाजपच त्याविषयी निर्णय घेणार नाही, असे कसे शक्य होईल, असा सवाल त्यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत केला. त्याच वेळी बाबरी विध्वंसानंतर भाजपशी युती करणारा जदयु हा शिवसेनेनंतरचा दुसरा पक्ष होता, याचे स्मरणही हुसेन यांनी करून दिले. रालोआमध्ये फूट पडेल, असा अपप्रचार विरोधक प्रत्येक निवडणुकीच्या वेळी करतात. पण त्यात ते यशस्वी होत नाही, असे ते म्हणाले.
उद्या बिहारमधील निवडणूक तयारीविषयी चर्चा करण्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होत आहे. यापूर्वी, उत्तर प्रदेशसंबंधीही अशीच बैठक झाल्यामुळे मोदी आणि जदयु हा उद्याच्या बैठकीचा मुद्दा नसेल, असा दावा भाजप नेते करीत आहेत.
जदयुला सांभाळण्यासाठी भाजपची कसरत
नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य नेतृत्वावरून जनता दल संयुक्तशी (जदयु) उद्भवलेल्या संघर्षांवर भारतीय जनता पक्षाने सामोपचाराने तोडगा काढण्याचे ठरविले आहे. मोदींची मुक्तकंठाने प्रशंसा करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह रालोआतील सर्व घटक पक्षांचे ऐक्य शाबूत राखण्याला प्राधान्य देत तारेवरची कसरत करीत आहेत.
First published on: 18-04-2013 at 04:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp doing exercise to keep jdu