भारतातील प्रत्येक कम्युनिस्ट नेत्याचा प्रभाव संपवून त्यांना निष्प्रभ करण्याचे भाजपाचे ध्येय असल्याचे भाजपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अशोक सिन्हा यांनी सांगितले. त्रिपुरा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना राज्यातील काँग्रेस-सीपीआय (एम) विरुद्ध भाजपा असा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. अशोक सिन्हा म्हणाले, “काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले केले आणि आता आमच्याविरोधात निवडणूक आयोगासमोर ते कांगावा करत आहेत.” तसेच १८ जानेवारी रोजी जिरानिया येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये हमरीतुमरी झाली असता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) त्रिपुराचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार जखमी झाले होते. याबद्दल सिन्हा यांना विचारले असता ते म्हणाले की, “काँग्रेसने केलेले आरोप बिनबुडाचे असून उलट काँग्रेसनेच आमच्या बूथ कार्यालयाची तोडफोड केली.”
“निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे की, काँग्रेसनेच राजकीय राडा सुरु केला. या राड्याचे नेतृत्व काँग्रेसच्या एका राष्ट्रीय नेत्याने केले. त्यांनी आमच्या बूथ कार्यालयाची जाळपोळ केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उलट काँग्रेसनेच आयोगासमोर जाऊन डॉ. अजॉय कुमार गंभीर जखमी झाल्याचे लेखीस्वरुपात सांगितले. मात्र प्रत्यक्षात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. काँग्रेसच्या याच खोट्या आणि निराधार राजकारणामुळे देशभरात त्यांना नाकारण्यात येत आहे”, अशी टीका डॉ. सिन्हा यांनी केली. काही दिवसांपूर्वीच आगरतळा शहरातील दक्षिण इंद्रनगर येथे भाजपच्या बूथ कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपाकून प्रतिक्रिया समोर आल्या.
बूथ कार्यालयाची जाळपोळ झाली असता पोलिस आणि स्थानिकांनी पुढे येऊन आग विझवली. भाजपाने या घटनेला सीपीआय (एम) आणि काँग्रेस आघाडीला जबाबदार धरले. डॉ. अशोक सिन्हा म्हणाले, “आज त्यांनी आमच्या कार्यालयाची जाळपोळ केली. आम्हाला त्याचे काही आश्चर्य वाटत नाही. ते पुर्वीपासून हेच करत आले आहेत. आधी बिहारमध्ये असाच हिंसाचार घडवला. मग बिहार शांत झाला. पण जिथे जिथे कम्युनिस्ट लोक आहेत, तिथे तिथे हिंसाचार आहेच. त्यामुळे कम्युनिस्टांना निष्प्रभ करणे आमचे ध्येय आहे.”
“आमचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. एक दिवस असा येईल जेव्हा आम्ही भारताच्या नकाशातून कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येक नेत्याचा नायनाट केलेला असेल.”, सिन्हा यांनी हे वक्तव्य केल्यानंतर काही वेळातच त्यांनी घुमजाव केले. कम्युनिस्टांचा नायनाट म्हणजे सर्व कम्युनिस्ट इतर पक्षात प्रवेश करतील, असे मला म्हणायचे होते अशी सारवासारव त्यांनी केली. त्रिपुरा येथे १६ फेब्रुवारी रोजी ६० जागांसाठी त्रिपुराच्या विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्याचा निकाल २ मार्च रोजी लागेल.